Sunday, August 20, 2023

🛑 भाईमामा : द ग्रेट मामा

🛑 भाईमामा : द ग्रेट मामा

          प्रत्येकाला मामा असणे खूप गरजेचं असतं. आईचा भाऊ म्हणून आपल्या भाचरांची काळजी घेणारा मामा सर्वांनाच नेहमीच हवाहवासा वाटत असतो. ज्यांना एकही मामा नसेल त्यांना मामा नसल्याचं दुःख सतत सतावत असणार.

         आम्ही भावंडे मात्र मामांच्या बाबतीत अतिश्रीमंत आहोत. आम्हाला सहा मामा. चार सावत्र आणि दोन सख्खे. आबामामा , नानामामा , अण्णामामा आणि भाऊमामा हे चार सावत्र मामा. भाईमामा आणि बालामामा हे माझ्या आईचे सख्खे भाऊ. 

          आज यापैकी पाच मामा हयात नाहीत. बालामामा हे माझ्यासाठी नेहमीच आयडॉल ठरले आहेत. रत्नागिरीत असताना त्यांनी मला दिलेली शाबासकीची थाप अजूनही पाठीवर तशीच आहे.

          मोठ्या सर्व सावत्र मामांचे अनेक उत्तम संस्कार मनावर कोरले गेले आहेत. ते सुसंस्कार होते म्हणून मी आज असा आहे. 

          मला आज माझ्या भाईमामांबद्दल सांगायचे आहे. ते जाऊन आज आठ वर्षे होत आहेत. त्यांच्या आठवणी अजुनही ताज्याच आहेत. मी त्यांना कधीही विसरु शकणार नाही.

          भाईमामा म्हणजे एक शांत संयत व्यक्तिमत्त्व. एक हाडाचे प्राथमिक शिक्षक. घरात मवाळ , पण शाळेत जहाल. जहाल म्हणजे कडक शिस्तीचे. त्यांचं हसू ओठातल्या ओठातच. त्यांचं प्रेम पोटातल्या पोटात. प्रेम आहे पण ते सहसा कळू द्यायचे नाही असा त्यांचा स्वभाव. 

          मी मोठा होत असताना भाईमामांना अगदी जवळून बघत आलोय. दर शनिवारी ते आमच्या दुकानात येत. सहजच. फक्त आम्हाला भेटायचे निमित्त असे. ते एखाद्या शनिवारी आले नसले तर आम्हाला त्यांची आठवण येत राही. अजूनही येते. 

          ते आले की एक चैतन्य दुकानात शिरत असे. मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असू. येताना त्यांनी चहा आणि शेवचिवडा यांची ऑर्डर हमखास दिलेली असे. बोलता बोलता टकल्यांच्या हॉटेलमधील आम्हांला सगळ्यांना आवडणारा शेवचिवडा समोर येत असे. आम्ही सर्व मिळून चिवडा फस्त करण्याची आठवण अजूनही जात नाही. हे अप्रतिम क्षण पुन्हा कधीही येणार नाहीत. 

          भाईमामांनी आम्हांला अनेकदा आर्थिक आधार दिला आहे. मानसिक आधार तर ते नेहमीच देत असत. त्यांना पान खाणे आवडायचे. पान तयार करण्याची त्यांची पद्धत आगळी होती. एखादे सुंदर पान निवडून त्याच्या सर्व शिरा काढून नंतर चुना लावत असताना तंबाखुची निवडक पाने त्यात टाकली जात. मग त्याला एक विशिष्ट घडी घालून पानाची तोंडात उडी पडे. हे करत असताना त्यांच्या गप्पा सुरुच असत. माझे मात्र त्यांच्या या हालचालींकडे अधिक लक्ष असे. 

          मी शिक्षक झाल्यानंतर लवकर नोकरीला लागण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझ्यासोबत आले. आदल्या दिवशी रात्री त्यांनी मला केलेले मार्गदर्शन मी कदापि विसरणार नाही. ते म्हणाले , " हे बघ भाच्या , तू मागे मागे राहू नकोस. मी मागे राहिलो. मी कधी चारचौघात बोललो नाही. पण तू मात्र तसे करु नकोस. प्रत्येक वेळी संधी तुझ्याकडे चालून येईल , त्या सर्व संधींचे सोने करणे फक्त तुझ्या हातात आहे. " 

          त्यांचे हे मार्गदर्शन मला नेहमीच पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आज मामा नाहीत , पण त्यांचे ते अनमोल शब्द सदैव माझ्यासोबत असतात. 

          सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक दोन महिन्यांतच ते आजारी पडले. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने डोंगराएवढे प्रयत्न केले. लाखो खर्च केले. परंतु आठ वर्षांपूर्वी ते आम्हाला कायमचे सोडून निघून गेले. एका मार्गदर्शक तत्त्वाचा अंत झाल्याची भीती माझ्या मनात वाटून गेली. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मी माझ्या आठवणींच्या कुपीत अगदी जपून ठेवली आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Tuesday, August 8, 2023

🛑 ' कारटो ' ची कल्पना

 🛑 ' कारटो ' ची कल्पना

          कल्पना धाकू मलये नावाची माझी डीएडची मैत्रीण. तिने ' कारटो ' नावाची एक बालकादंबरी लिहिली आहे. ती खूप छान लेखन करते. तिने केलेलं लेखन वाचकाला भावणारं आहे. लहानपणी घडणाऱ्या कित्येक गोष्टी कल्पनाने लक्षात ठेवल्या आहेत. गोष्टी नुसत्या लक्षात ठेवून चालत नसतात , त्या काळजीपूर्वक आणि क्रमबद्ध मांडाव्या लागतात. कल्पनाने अगदी तसंच केलंय. 

          बालमनाला दांडगा अभ्यास असणारी व्यक्तीच असं करु शकते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा बारकाईने विचार केल्याने कादंबरी वाचनीय झाली आहे. कादंबरीच्या नावामुळे तर ती हातात घेऊन बघण्याचा आणि वाचण्याचा मोह व्हावा. कल्पना चांगलं लिहिते एवढं मला माहिती होतं. पण ती अतिशय कसदार आणि दर्जेदार लिहू शकते हे ' कारटो ' वाचल्यानंतर कोणीही सांगू शकेल. लेखिका म्हणून कल्पना जिंकली आहे. तिने कारटो मध्ये अनेकानेक परखड मतं व्यक्त केली आहेत. एक महिला असं लिहिते आहे म्हणून आणखी अभिमानास्पद आहे.

          मालवणी बोलणारी अनेक प्रसिद्ध माणसे मी बघितली आहेत. नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांना मी लहानपणापासून ऐकत आलोय. मी ज्याठिकाणी राहायला होतो , तिथे शेजारी गॅरेज होते. त्या गॅरेजमध्ये ते एकदा आले होते. मी धावत जाऊन त्यांची सही घेतल्याचे मला चांगलेच आठवते आहे. त्यावेळीसुद्धा ते माझ्याशी शुद्ध मालवणीत बोलले होते. त्यांची बरीच नाटके प्रत्यक्ष पाहिली , तेव्हा त्यांचं मालवणी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येतं. कल्पनाची मालवणी भाषेवरील तशीच पकड असल्याचे दिसून येते. शक्यतो तिची मालवणी भाषा शुद्ध आणि जिव्हाळ्याची वाटते. मालवणी शब्दांना तिने लहानपणापासून अधिक आपलेसे केले असावे. आम्हां लोकांना प्रमाणभाषेचं कोडकौतुक वाटत असतं. ती बोलताना आम्ही मालवणी भाषेचं टोनिंग वापरताना अनेकदा चुकत असतो. हे चुकलेलं पुण्यातील लोकांना लगेच समजतं. कारण आमची प्रिय मालवणी भाषा हेल काढणारी आहे. ती हेल वगैरे काढणारी असली तरी ती आम्हाला प्रिय आहे. 

          कल्पना मलये हिने लहान असतानाच्या तिला शंका वाटणाऱ्या गोष्टी जशास तशा मालवणीत शब्दबद्ध केल्या आहेत. तिची मराठी भाषाही स्वच्छ आणि शुद्ध असते. तिला दोन्ही भाषेतून बोलताना आणि तिने दोन्ही भाषेतून लिहिलेले वाचताना तिची साहित्यविषयक उंची लक्षात येते. मीसुद्धा थोडेफार लेखन करतो. तरीही तिची उंची गाठू शकण्यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागेल. 

          तिच्या पुस्तकाला वाचल्याशिवाय बोलणे हे कधीही मूर्खपणाचे ठरेल. तिच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघू शकतात म्हणजे तिचे पुस्तक वाचायलाच पाहिजे असा अर्थ होतो. कोणत्याही लेखकाचे किंवा लेखिकेचे पुस्तक न वाचता आपल्याला कोणतेही भाष्य करता येणार नाही. ते पुस्तक वाचल्याशिवाय त्यात काय वेगळं आहे ते समजणारही नाही. त्यासाठी ते स्वतः विकत घेऊन वाचले पाहिजे. विकत घेऊन पुस्तक वाचण्यात नक्कीच मजा असते. पुस्तक संग्रही राहतं हा आणखी एक फायदा. 

          पुस्तकाचं शीर्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ' कारटो ' हे नाव म्हणजे एका आपल्यासारख्याच प्रश्न विचारणाऱ्या मुलाच्या नावाचं संक्षिप्त रुप आहे. हा मुलगा चोखंदळ आहे , विज्ञानावर प्रेम करणारा आहे. शंकांची उत्तरं शोधून काढणारा आहे. म्हणून हा कल्पना मलये यांचा ' कारटो ' सर्वांनाच सतत भुरळ घालत राहणार आहे. यांवर आधारित एखादा चित्रपट किंवा बालनाट्य बनायला हरकत नाही. कल्पनाने केलेल्या कल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर प्रत्येकाने हे पुस्तक नक्की घ्या आणि नुसतं घेऊन उपयोग नाही , ते शेवटपर्यंत वाचून काढा. मग समजेल ' कारटो ' म्हणजे काय रसायन आहे ते !!!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...