Sunday, July 30, 2023

🛑 असा रंगारी श्रावण

🛑 असा रंगारी श्रावण

          आषाढ महिना संपला कि श्रावण महिन्याची चाहुल लागते. तो येतो आणि जो आनंद होतो , तो शब्दबद्ध करणं खूपच कठीण असतं. हा स्वानंद अनुभवावा लागतो. तो अनुभवल्याशिवाय कळणार नाही. 

          बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाही श्रावण महिन्याने भुरळ घातली. त्यांनी लिहिलेली कविता सर्वश्रुत आहे. ' श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ' ही कविता म्हणताना साक्षात श्रावण समोर उभा राहतो. इतकी त्यांच्या काव्यात ताकद आहे. 

          श्रावणात सर्व निसर्ग बहरुन जातो. पावसाला उधाण आलेलं असतं. हिरव्यागार झाडावेलींना पाहताना डोळे निवून जातात. आकाशात विविध रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य त्यात भर घालत असतं. पशुपक्षी आनंदात नाचू लागतात. शेतकरी सुखावतात. त्यांची शेती करतानाची कार्ये उत्स्फूर्तपणे सुरु असतात. 

          या महात हिंदू धर्मातील विविध सण येतात. पावसाच्या रिमझिम रेशीमधारा बघतच रहाव्याशा वाटतात. फुलांची बाग अधिक आनंदाने हसताना दिसते. विविध रानभाज्या खुलून दिसतात. 

          गावाकडे घराघरात श्रावण सोमवारी शंकर महादेवाची व्रतवैकल्ये केली जातात. उपवास केले जातात. लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही झोपाळ्यावर झोके घेण्याचा आनंद घेता येत असतो. मंगळागौर , नागपंचमी , रक्षाबंधन , नारळीपौर्णिमा , गोकुळाष्टमी , गोपाळकाला असे सण श्रावण महिन्याचे मुकुटच असतात. मांसाहार न करता पूर्ण शाकाहारी राहण्यासाठी निसर्गदेवता श्रावण महिन्याच्या रुपाने माणसाला साद घालत असते. 

          भक्तीभावाने भारावून गेलेली माणसे श्रावणाची वाट पाहत असतात. एखाद्या ग्रंथाचे वाचन सुरु करण्यासाठी श्रावण महाचे औचित्य लागत असते. 

          असा हा श्रावण सर्वांचाच लाडका ऋतू असतो. 

©️ प्रवीण कुबलसर



🛑 एक घास पप्पांचा

🛑 एक घास पप्पांचा

          बालपणी बालभारतीच्या पुस्तकात ' पेरुची फोड ' असा एक धडा होता. त्यात " पेरुची फोड , लागते गोड "  असे म्हटले होते. त्यापुढे असेही म्हटले होते , " आईची फोड , फारच गोड ". खरंच या दोन्हींमधील पुढची ओळ जास्त लक्षात राहते. कारण ती आईने दिलेली फोड आहे. 

          प्रत्येक मुलांचे आपल्या आई बाबांवर निरतिशय प्रेम असते. आईला भेटण्यासाठी मुले आतुर झालेली असतात. शाळेतून घरी येताच आम्ही पहिल्यांदा आईला कडकडून मिठी मारत असू.  ही मिठी आता मिळत नाही , कारण आईच नाही. 

          आई जशी महत्त्वाची असते , तसे बाबाही महत्त्वाचे असतात. आई प्रेमळ असते. बाबा शिस्तीचे असतात. कधीकधी याउलट असू शकते. काहीवेळा दोन्ही पालक प्रेमळ आणि शिस्तप्रिय असू शकतात. त्यांनी तसेच असायला हवे असते. मुलांसाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी हे सर्वच आवश्यक असते. 

          आई मुलांना भरवते. मुले कितीही मोठी झाली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. बाबा मुलांना मारतात , तेव्हा आई रडणाऱ्या मुलांना जवळ घेते. हे जवळ घेणे त्यावेळी दिलासा देणारे असते. मला आईने क्वचितच मारले असेल. बाबांचा मार अनेकदा खाल्ला आहे. अजूनही त्यांच्या शब्दांचा मार मिळत असतो. बाबांनी मारल्यानंतर आम्हाला आईचा आधार असे. तिच्या पदरात लपताना जी प्रेमाची ऊब मिळे ती कुठेच मिळणार नाही. 

          माझे आजोबा भरपूर जेवत असत. त्यांच्या जेवणातील एखादा घास मिळण्यासाठी माझे बाबा आसुसलेले असत असं ते सांगतात. माझी आजी तर खूपच प्रेमळ आणि धार्मिक होती. तिने कुठूनही आणलेला खाऊ सर्वांना समान मिळण्यासाठी तिची धडपड असे. लग्न होऊन मुले बाळे झालेल्या मुलांनाही ती लक्षात ठेवून खाऊचा वाटा देत असे. तिच्या निस्सीम मायेची तुलना करणे चुकीचे ठरेल. तिने आम्हाला घास भरवले आहेत. कालवलेला घास तिच्या हाताने खात असताना ती स्वतः सुद्धा आपल्या तोंडाचा ओ करत असे. त्यावेळी तिच्या सुरकुत्या आलेल्या हातांची सैल झालेली कातडी एकत्र करुन तिच्याशी मी खेळत बसलो तरी ती काहीही म्हणत नसे.

          आईने आणि बाबांनीही मला भरवले आहे. मी रात्री , मध्यरात्री अचानक घायाळ पडत असे. मी घामाघूम होई. तेव्हा आईबाबा दोघेही माझ्या जवळ बसून भरवू लागत. त्यावेळी मिळत असलेल्या प्रेमाने मी आणखीच घायाळ होऊन जाई. 

          आता मीही तीन मुलींचा बाबा झालो आहे. मला त्या पप्पा म्हणतात. तिन्ही मुली पप्पांच्या एखाद्या घासासाठी टपलेल्या असतात. मुले कितीही मोठी होत असली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. त्यादिवशी माझी दोन नंबर मुलगी हट्टच धरुन बसली. मी जेवत होतो. तिला माझ्या जेवणातला एक घास हवा होता. माझे बाबा जवळच होते. मी जेवत असताना त्यांचे माझ्या जेवण्याकडे लक्ष असते. ताटातील भाजी , भाकरी संपत असली तर ते आपल्या सुनेला सांगत असतात. मी मागण्यापूर्वी माझ्या ताटात संपलेला पदार्थ यायला हवा यासाठी त्यांचा हा अट्टाहास असतो. त्यांना मी कितीही सांगितले तरी त्यांनी त्यांची ही सवय अजिबात सोडलेली नाही. 

          मी माझ्या तिन्ही मुलींना एक एक घास भरवू लागलो. मी भुकेलेला असलो तरी त्यांच्या मुखात जसा घास जाई , तशी माझे पोट भरत असल्याचा अनुभव येत जाई. पप्पांनी भरवलेला घास छोटा असला तरी तो त्यांच्यासाठी नेहमीच भारावलेला असतो अगदी आमच्या आईबाबांसारखा. 

©️ प्रवीण कुबलसर



Wednesday, July 12, 2023

🛑 रमला वाचनमेळा

🛑 रमला वाचनमेळा

          वाचन करणे ही आपली संस्कृती बनली पाहिजे. वाचनाची चळवळ जोपासणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. मुले आणि काही मोठी माणसेही मोबाईल वाचतात. हा मोबाईल वाचणे म्हणजे अनेक मानसिक रोगांना आमंत्रण देणे आहे. त्यापेक्षा पुस्तके वाचणे कधीही चांगले. त्यात मध्येच काहीतरी अनाहूत येत नाही. आपल्या वाचनाचा लक्ष दुसरीकडे वळत नाही. 

          मुलांना वाचनासाठी उद्युक्त करणं हे तसं सोपं काम नसलं तरी अवघड मुळीच नाही. पुस्तकं त्यांच्या आजूबाजूला दिसायला हवीत. ही आकर्षक पुस्तकेच त्यांना आकर्षित करु शकतात. फक्त ही पुस्तके त्यांच्या नजरेच्या कक्षेत ठेवायला हवीत. 

          दुपारी शाळेचे माध्यान्ह भोजन संपन्न झाले. मुले जेवल्यानंतर या वर्गातून त्या वर्गात उगीचच फिरताना दिसत होती. कोणी कोणाची पाठ धरत होतं. कोणी काहीबाही करताना दिसत होती. दप्तरातील पुस्तके त्यांची वाट पाहत होती. ती दप्तरात किंवा कपाटात बंद होती. बिचारी हिरमुसली होती. आपल्याला कोणी वाचत नाही म्हणून त्यांचे नाराज होणे साहजिकच होते. 

          मी हळूच कपाट उघडले. त्यातली कदाचित नाराज झालेली पुस्तके मी बाहेर काढली. मुलांना व्हरांड्यात बोलवून घेतले. एकेका मुलाला आकर्षक मुखपृष्ठ असलेले पुस्तक देताना मला खूपच आनंद होत होता. मी काहीतरी वाटतोय हे बघून हळूहळू सगळी मुले माझ्याकडे पुस्तके मागायला आली. मी आपला पुस्तके काढून काढून वाटतच राहिलो. 

          मुलांनी जागा मिळेल तिथे फतकल मारुन बसणे पसंत केले. पुस्तकातील चित्रे बघताना त्यांचे चेहरे मी बघत होतो. पुस्तकं वाचनाचा हा आगळा वेगळा वाचनमेळा पाहून मलाही माझ्या बालपणीची आठवण येऊन गेली. आम्ही त्यावेळी खूप वाचन करीत असू. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड आम्हांला या पुस्तकांनीच लावली होती. हल्लीच्या मुलांना मोबाईलचे आकर्षण असल्यामुळे त्यांना पुस्तकांविषयीचे आकर्षण वाटत नसावे. 

          नुकताच पहिलीत प्रवेश घेतलेला सार्थक माझ्याकडे आला. तो म्हणाला , " सर , मला पुस्तक द्या. " मी त्याला चित्रांचे छान पुस्तक दिले. त्याने त्यातली सर्व चित्रे भराभर बघून घेतली. थोड्याच वेळात तो धावतच माझ्याकडे आला. म्हणाला , " सर , आता दुसरं पुस्तक द्या. " मी त्याला म्हटलं , " अरे सार्थक , हेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाच. नंतर आणून दे. " तो तयार नव्हता. ते पुस्तक माझ्या हातात कोंबत तो म्हणाला , " सर , मी पहिलीत आहे. मला हे पुस्तक वाचता कुठे येतंय ? " त्याचे अगदी बरोबर होते. मी त्याला दुसरे पुस्तक दिले. तो ते नवे पुस्तक घेऊन धूम पळाला आणि परत आपल्या जागेवर जाऊन त्यातील चित्रे डोळे फाडून कुतूहलाने वाचताना दिसला. 

          इतर मुलेही असेच काहीसे करत होती. माझा वेळ मात्र सार्थकी लागला होता. नाराज झालेली पुस्तकं पुन्हा हसताना दिसत होती. असा हा वाचनमेळा मुलांसाठी पर्वणीच ठरला होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून असे अनेक उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरुच असतात. हा उपक्रम त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी नवा नाही , पण मुलांसाठी मात्र नक्कीच वाचनवेडा आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
















Tuesday, July 4, 2023

🛑 पावसाची रंगतसंगत

🛑 पावसाची रंगतसंगत

          पाऊस आता चांगलाच सुरु झालाय. कालपासून त्याने संततधार सुरु केली आहे. गडगडाट नाही , मुसळधार तर नाहीच नाही. पण नुसता बरसतोय. सकाळी सकाळी त्याचा हा वर्षाव खुप सुखद आनंद देऊन जातोय. तो बाहेर छान कोसळतोय. मी मस्त पावसाची गाणी लावून ऐकत बसलोय. पावसाची जुनी गाणी आणि नवा पाऊस दोन्ही कसे भारावून टाकणारे आहे. 

          पाऊस आला की माझं असं होतं. पावसात जावसं वाटतं आणि घरात थांबावं असंही वाटतं. पण यापैकी एकच करता येऊ शकतं. 

          सकाळी लवकरच छोट्या उर्मीला शाळेत सोडायला जायचे असते. तिला मम्मीसुद्धा लागते. शाळेत जायची गडबड सुरु झालेली असते. ती उठायचे नाव घेत नाही. ती लाडात म्हणते , " पप्पा , जरा वेळ झोपते ना ? " माझी तयारी झालेली असते. उर्मीला मस्त आंघोळ करुन झाल्यावर कोमट पाण्यात हॉटबाथ घ्यायला नेहमीच आवडतं. आजही तिने हॉटशेक घेतलाच. रेनकोट वगैरे घालून तयारी करुन शाळेत निघालो. 

          पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. तो रेनकोटातून आत शिरु पाहत होता. पाच मिनिटांत पाऊस रेनकोटात शिरलाच. गारवा छान वाटतोय. मजा येतेय. मधूनच आलेली पावसाची मोठी सर थेट तोंडात पाणी ओतू पहात होती. चष्म्यातून धूसर दिसू लागले होते. चष्म्याला वायफर नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा पुसावा लागतोय. रस्ता अस्पष्ट दिसू लागलाय. चष्मा वापरणाऱ्यांचे सर्वांचेच असे होत असले पाहिजे. 

          मुलीला घरी सोडून आलो , तेव्हा कपड्यातून आत घुसलेला पाऊस आता मला पाहून बाहेरुन मिश्किल हसताना मला दिसला. मीही गालातच छान हसलो. मिलिंद इंगळे ऐकत बसलो. सौमित्र ऐकत बसलो. दोघेही आपल्या शब्दांनी , स्वरांनी मला चिंब भिजवून टाकत होते. आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी मस्त पाऊस अनुभवत होतो. पत्नीने वाफाळलेला आलेयुक्त चहा दिला. तिच्यासोबत चहा पिताना पूर्वीचा पाऊस आठवत होता. स्मृतींचाही असाच पाऊस असतो नाही का ? तोही प्रत्येकाच्या मनात असाच उदंड वर्षत असतो. 

          मलाही आता शाळेत जायचं आहे. शिकायला आणि शिकवायला. जातानाही पुन्हा पावसाची साथसंगत असणारच आहे. धोय धोय पडणारा हा पाऊस मनातही शब्दांचा धबधबा कोसळवतोय. 

©️ प्रवीण कुबलसर



Saturday, July 1, 2023

🛑 आईविना भिकारीच

🛑 आईविना भिकारीच

          तिन्ही जगाच्या स्वामीला आई नाही , म्हणून म्हटले जाते , " स्वामी तिन्ही जगांचा , आईविना भिकारी. "

          हे अगदी खरे आहे. आई नाही तर आपण सगळी तिची लेकरे भिकारीच आहोत. ती होती तेव्हा जी श्रीमंती होती , ती आज लाभत नाही. प्रत्येकाला आई असते , कारण आईशिवाय आपला जन्मच नसतो. ती तिच्या उदरात नऊ महिने , नऊ दिवस , नऊ घटका , नऊ पळे आपल्याला वाढवत असताना तिला झालेला त्रास तिला सुखकर वाटत असतो. तिला त्रास झाला तरी तिने त्याकडे दुर्लक्ष कायम दुर्लक्ष केलेले असते. 

          बाळाचा जन्म झाल्यावर तिचा चेहरा पाहावा. ती जगातील सर्वात श्रीमंत भासते. तिचा पुनर्जन्म झालेला असतो. बाळाचं हसणं , रडणं दोन्ही तिला स्वर्गसुख देत असतं.

          आईला आपली सर्व लेकरं प्रिय असतात. तिची सर्वांवर सारखीच माया असते. त्यात दुजाभाव नसतो. लेकरांनी कधीही असा गैरसमज करुन घेऊ नये. तिच्या प्रेमावर अविश्वास दाखवण्यासारखे पाप नाही. 

          आमची आई इतरांसाठी सर्वसामान्य असेल , पण आमच्यासाठी ती सदैव असामान्यच राहिली आहे. तिने आमच्यासाठी काय केले नाही ? तिने शेवटी आमच्यासाठीच आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ती तिच्या आजाराला कंटाळली. आम्हांला तिचा त्रास होऊ नये म्हणून तिने स्वतःला संपवले असावे. तिच्या कायमच्या डॉक्टरांनी हात टेकले. दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांकडे कधीही न जाणाऱ्या तिने आता धसका घेतला. माझ्या डॉक्टरांनी माघार घेतली म्हणजे माझे आता खरे नाही असे तिला वाटले असावे. ती आजारी पडली आणि बरी होण्याची चिन्हे दिसेनात. बाबांशिवाय तिने कोणाकडूनही सेवा करुन घेतली नाही. लग्न झालेल्या मुली आईला बघायला आल्या तरी पाहून जात. आईने त्यांच्याकडूनही सेवा करुन घेतली नाही. आम्ही दोन्ही मुलगे , दोन सुना सेवा करण्यापूर्वीच तिने राम म्हटला. 

          आपली मोठी सून आपल्या आधी गेली याचे अतीव दुःख तिला नेहमीच सलत राहिले असावे. तिच्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी ती हे जग सोडून गेली. बाबांची सहचारिणी बाबांना कायमची सोडून गेली होती. लेकरांना दुःख होतेच , पण बाबांना झालेले दुःख बाबांच्या डोळ्यांत दिसत होते. बाबांनी माझ्या आईवर जीवापाड प्रेम केले. रागाने बोलले तरी त्यात प्रेमाचा ओलावा अधिक होता. बाबांनी माझ्या आईची आठवण केली नाही असा एकही दिवस गेला नसेल. 

          आज आईचा चौदावा स्मृतीदिन आहे. बाबांच्या गळ्यातील चेन बाबांना टोचायला लागली. आईच्या मंगळसूत्रापासून ती बनवलेली आहे. ती आज टोचणारच , कारण ती आई आहे. तिने आज आपल्या पतीला स्पर्श केला आहे हे बाबांना समजलेही नाही. 

          आईचे आमच्यावरील प्रेम सदैव राहावे अशी मी तिच्याकडे प्रार्थना करतो. 

▪️ तिचो झिल



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...