Tuesday, October 29, 2019

भाऊबीज म्हणजे भावांसाठी आणि बहिणींसाठीचा आनंदमय दिवस

          असे अनेक दिवस साजरे केले जातात, पण भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो तो फक्त बहिणींच्या आणि भावांच्या आत्यंतिक प्रेमभावनेचे प्रतीक म्हणूनच. भाऊ बहिणींकडे जातात, बहिणी त्यांना प्रेमाने ओवाळतात, साष्टांग नमस्कार करतात. आदरपूर्वक स्नेहभेट देऊ करतात. भेटवस्तू एक आठवणभेट असते. तिचे मूल्य करता येत नाही. ते अमूल्य असते प्रत्येकासाठी. माझ्या बहिणीने ती भेट दिलेली आहे, हा आनंद भावाच्या मनात सदैव दरवळत असतो. बहिणी वाट बघत असतात, भावांच्या येण्याची. त्यांना फक्त भावाचे येणे हवे असते. त्याने आणलेली भेटवस्तू त्यांच्यासाठी महत्त्वाची असली तरी त्याचसाठी भाऊबीज होत नसते. माझ्या घरी भाऊ आला याचा आनंद ती बहीण मिरवीत असते. दिवाळीच्या सर्व दिवसांमधील अत्यंत आनंदाचे क्षण असतात ते तिच्यासाठी. भावाचे आदरातिथ्य करताना काही चुकणार तर नाही ना, ही भीतीसुद्धा असते तिला. आपण दिलेली भेट माझ्या भावाला आवडेल तरी, कि भाऊ नाराज होईल असे अनेक प्रश्न तिला नेहमीच पडत असावेत.
          पण भाऊ मात्र निरपेक्ष भावनेने तिच्या घरी गेलेला असतो. आपल्या कुटुंबातील आनंद जपता जपता त्याला आपल्या बहिणींना सुद्धा सुखी पहावयाचे असते. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या लकेरी पाहण्यासाठी भाऊ तिच्या घरी धावून जात असतो. तो आपल्या मिळकतीमधील आपल्या बहिणीला साजेल असा उपहार नेण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असतो. त्याची किंमत कमीसुद्धा असेल , पण त्यात भावाची माया भरलेली असते. ती वस्तू माझी लाडकी बहीण वापरणार आहे, हा विश्वास त्याला असतो. बहिणीचे सर्व कुटुंब सुखी बघताना भावाला जो आनंद होत असतो , तो आनंद फक्त भावांनाच माहित असतो. कधी भावाच्या डोळ्यात आनंदाचे उबदार अश्रू येतात. तो भाऊ हळुवार पुसून पुन्हा कुणाला जाणवू देत नसतो. अपार श्रद्धा असते त्याची आपल्या बहिणीवर. ती बहीण मोठी असो नाहोतर छोटी असो, बहीण म्हणजे आईच असते. आईनंतर लगेचच प्रेमाने कुरवाळणारी ती ताई असते किंवा आक्का असते. छोटी असली तर कुशीत शिरणारी पपी देखील असते.
           माझ्या बहिणी किती याचं  उत्तर संख्येत देणं चुकीचं ठरेल. कारण माझ्या अनंत बहिणी आहेत. ताई, आका, पपी , पिंक्या, बिंटा , आरती, सीमा, भारती , मुन्नी, सरिता, ज्ञानी, चित्रा , क्रांती, शांती, गायत्री, तृप्ती, नीलिमा, सुविधा, सुप्रिया, मनाली आणि बायग्या आका अशा सर्व बहिणी आज मला आठवतात. याचा अर्थ असा नव्हे कि त्या मला आजच आठवतात. प्रसंगानुरूप त्यांची आठवण येतच असते. पैकी चार बहिणींची लग्ने अजून झालेली नाहीत. बाकी सर्व बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी सुखात आहेत. बहिणी सख्ख्या , चुलत, मामे, आत्ये असा भेद आमच्याकडून कधीच झाला नाही. तो कधी होणार नाही याची काळजी घेणं ही  आमची जबाबदारी असणार आहे. पण फक्त भाऊबीजेपुरतं भावाबहिणीचं नातं मला मान्य नाही. माझ्या दृष्टीने ज्या दिवशी माझ्या बहिणी माझ्या घरी येतील, तेव्हा तेव्हा माझ्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीजच असते. म्हणूनच मी गेल्या वर्षांपासून माझ्या प्रिय बहिणींकडे जाण्याचे टाळायला लागलो आहे. माझे हे चुकीचे असेल कदाचित. पण काही बहिणींकडे गेलो आणि काही बहिणींकडे गेलो नाही तर  मात्र ज्यांच्याकडे गेलो नाही त्यांना वाईट वाटणे साहजिकच आहे. पण म्हणून काय माझ्या प्रिय बहिणींबद्दलचे प्रेम काही कमी होत नाही. उलट मी गेलो नाही म्हणून तर मला माझ्या सर्व बहिणी अगदी खूप जवळ आल्यासारख्या वाटत आहेत. त्यांच्या माझ्या बालपणीच्या आठवणी तर अगदी  ताज्यातवान्या होऊन माझ्यासमोर नाचू लागल्या आहेत. आज मला सगळ्या बहिणींचे फोन आले. शुभेच्छा मिळाल्या. मी धन्य झालो. माझ्या सर्व बहिणींची माया मला माझ्या आयुष्यात अधिक पुढे नेण्यासाठी बळ देते आहे असे म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण माझ्या सर्व बहिणी निःस्वार्थी आहेत, हे मी निक्षून सांगू शकतो. माझ्यावर  निरपेक्ष भावनेने प्रेम करणाऱ्यां माझ्या सगळ्या बहिणी मला महानच वाटतात. त्यांनी कधी आम्हा भावांचा राग केला नाही. भावांकडून कधीच कसलीच अपेक्षा ठेवली नाही. आम्ही फक्त त्यांच्यासोबत आहोत हा आधारच त्यांना हवा असतो. त्यासाठी त्या आसुसलेल्या असतात. आज माझा भाऊ न्हानू किंवा सर्वांचा अण्णा बहुतेक बहिणींच्या गृही जाऊन भाऊबीज साजरी केली. त्याने तो आनंद साजरा केला. तो दरवर्षीच जातो. कधी चुकवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होत नाही. जेवढे जमेल तेवढे सर्व बहिणींना खुश ठेवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना माझे सलाम आहेत. तो माझ्यापेक्षा लहान असला तरी मनाने माझ्यापेक्षा खूपच मोठा आहे. तो रागावतो, रुसून बसतो, पण त्यात त्याचे प्रेमच लपलेले असते. तो जेव्हा खुश असतो, तेव्हा त्याचे डोळे पाहावे , मी असा खुश झालेला माझा न्हानू बऱ्याचदा पाहिला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तो माझ्याकडे आला  आणि मला घट्ट कडकडून मिठी मारली. त्यात जे प्रेम होते , ते त्याचे प्रेम मला सतत मिळत राहावे असे वाटत राहते. मी मोठा असल्यामुळे कधी कधी कठोर होतो, पण मी सुद्धा हळवा आहे. माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो. कधी कधी वाटते, आपल्या परमप्रिय भावाला भाऊबीज केली तर ? भावाभावांमधली नाती अधिक सुदृढ होण्यासाठी असेही घडायला हवे. आम्हाला भरपूर बहिणी आहेत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. ज्यांना बहिणी नाहीत त्यांचे काय होत असेल ? ज्यांना भाऊ नाहीत त्यांचे काय होत असेल ? कल्पनाच केलेली बरी. सर्व बहिणी आणि भाऊ जिथे असतील तिथे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. त्यांच्यावर येणारे संकट वळून आमच्यावर येवो, आणि त्या आलेल्या सर्व संकटांना पार करण्याचे सामर्थ्य सर्व भावांमध्ये येवो. सर्व माझ्या बहिणींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा बाळू किंवा लाडका दादा. 

Friday, October 25, 2019

Happy Diwali 2022

🏮🏮Happy Diwali 2022

          नमस्कार ....🏮🏮HAPPY DIWALI 🏮🏮सुसंधी , आशा आणि आकांक्षा यांनी उजळून जावो तुमचं जीवन.....साजरा करा...उत्सवी आनंद....तुमच्या जीवनात येऊदे पुन्हा एक नवी पहाट..पुन्हा एक नवी आशा..तुमच्या कर्तृत्वाला..पुन्हा मिळू दे एक नवी दिशा....दीपोत्सवाने आपले जीवन आनंदाने व सुखाने उजळू दे...आपणां सर्वांना दिवाळीच्या ' पवित्र ' शुभेच्छा ....आरोग्य आणि संततीसौख्य लाभो...सार्वजनिक क्षेत्रात यश मिळो...आध्यात्मिक ओढ लागो...भाग्य उजळो...मोठ्या पराक्रमाचे वर्ष जावो...गृहसौख्य लाभो...आणि नोकरी व्यवसायात भरभराट होवो...इच्छित फलप्राप्ती होवो.

शुभेच्छुक ....प्रवीण कुबल आणि समस्त कुबल परिवार...कणकवली .



Thursday, August 15, 2019

तुझा हात माझ्या हाती असू दे

काय असते रक्षाबंधन ?

          आम्ही भावंडे रक्षाबंधन येण्याची नेहमी वाट बघत बसतो. तेवढेच बहिणी भावांच्या आठवणी जागृत होतात. पण एक वर्षाने येणारे हे रक्षाबंधन खूपच उशिराने आल्यासारखे वाटत राहते. भाऊ बहिणीच्या येण्याची  आतुर होऊन वाट बघत असतो. बहीण कधी एकदा राखी बांधून भावाला भेटून जाण्यासाठी व्याकुळ झालेली असते. दोन्हीकडून प्रेमाने व्याकुळ होणे सुरूच राहते. कित्येक वर्षांपूर्वीचे रक्षाबंधन आठवते, त्यावेळी मोठ्या थोरल्या राख्या असत. स्पंजच्या राख्या, लोकरीच्या राख्या , मण्यांच्या राख्या आणि दरवेळी येणारे ट्रेंड्स अशा राख्या बघत राहायला आवडतात. बहिणींना ही  घेऊ कि ती घेऊ असे होऊन  जात असेल. भारीवाली राखी माझ्या लाडक्या भाऊरायासाठी म्हणत बहीण आपल्याकडे साठलेले सर्व पैसे खर्च करून राख्या घेत राहतात. खूप बहिणी असलेले भाऊ आपल्या हातात किती राख्या बांधल्या आहेत त्या मोजत राहतात. संध्याकाळपर्यंत संपूर्ण हात भरून जातो. लहानपणी छोट्या हातात मोठ्या राख्या बांधल्या जात, आता मात्र उलटे झाले आहे, मोठ्या हातांमध्ये छोट्या राख्या बांधण्याची फॅशन येऊ लागली आहे.
            काहीही झाले तरी दिवसभर राख्यांनी बांधलेले दोन्ही हात फिरवत आम्ही दोघे भाऊ सर्वांना दाखवत सुटत असू. कोणी कोणती राखी बांधली याचे सर्वांनाच अप्रूप असे. जेवढी मोठी राखी तेवढी अधिक माया असे आम्हाला त्यावेळी वाटत असे. आता मात्र ती माया कमी झाली की  काय ? कारण आता खूपच छोट्या राख्या बाजारात येत आहेत, आणि अतिशय महागड्या सुद्धा आहेत. राखी कसलीही असो, भगिनीप्रेम मात्र त्यात पुरेपूर भरलेले दिसे. भावाकडून कोणतीही अपेक्षा कधीही न बाळगणाऱ्या आमच्या बहिणी अजूनही  तश्याच आहेत. त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. राख्या छोट्या झाल्या , पण माया अधिक मोठी झाल्याचे आजही लक्षात येते. खूप लांब गेलेल्या बहिणी फक्त अंतराने लांब गेल्या , पण अंतःकरणाने खूप जवळ येत आहेत. लहानपणीच्या गोड आठवणी जपत अधिक प्रेमभराने डोळ्यात आनंदाचे अश्रू आणत आहेत. बंधुप्रेमाने भारावून जात , फोनवरून बोलत आहेत. व्हिडिओ कॉल  करून जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत.
            ताईने दिलेली प्रेमाची शिकवण , आकाने दिलेली प्रेमाची चापटी , पपीने लटक्या रागाने केलेला तोंडाचा
ओ आजच्या सेल्फीपेक्षा खूपच भारी आहे. आईचे रक्षाबंधन , मामांची ओवाळणी यामुळे रक्षाबंधन आमच्यासाठी आनंदोत्सव असे. आम्हाला त्या दिवशी खूप सारा खाऊ मिळत असे. मामाचे आमच्याकडे येणे आम्हाला नेहमीच सुखावणारी गोष्ट असे. त्यांची गोड स्मित हास्याची लकेर आम्हाला आमच्यात स्फुल्लिंग पेरून जात असे. आज त्यांनीही आठवण येते आणि जीव कासावीस होतो. त्यांच्यासोबतच दिवस अविस्मरणीयच होते. आई गेल्यांनतर दर  राखीपौर्णिमेला ते आईच्या प्रतिमेला हार घालण्यास येत ते बघताना आम्हालाही त्यांचे बहिणीवर असलेले निर्व्याज प्रेम दिसत असे. आम्ही त्यांच्याकडूनच बहिणीवर कसे प्रेम करावे ते शिकलो. आई आणि भाईमामांच्या अश्या आठवणी आहते कि ती भावंडे कधी वाद खेळताना दिसली नाहीत. आज आम्ही मात्र बारीक सारीक कारणांचा  बाऊ करतो. वाईट वाटून घेतो. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवतो. दुसऱ्यांना दोष देत बसतो. आपलेच बरोबर , दुसऱ्याचे चुकले म्हणून कुढत बसतो. हे कसले प्रेम ? ही  असेल निव्वळ देवघेव आणि लोकांना दाखवण्यासाठी केलेली राखीपौणिमा.
            आजसुद्धा राख्या पोष्टाने येतात, लवकर येतात, कधी उशिराने येतात. त्यात अगदी तश्याच भावना पाठवलेल्या असतात. त्या फक्त समजणे भावासाठी मोठे काम असते. आम्ही दोघेही भाऊ आमच्या सर्व सख्ख्या , चुलत बहिणींना, मामेबहिणींना  कधीही अंतर दिलेले नाही आणि पुढे देणार नाही. त्यांनी राख्या पाठवो अगर न पाठवो ...त्या सर्व बहिणी आमच्या दोघांसाठी  सर्वश्रेष्ठच आहेत. त्यांनी आम्हांला कधीही हाक मारावी, आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी धावून जाऊ. जगातील माझ्या सर्व बहिणींसाठी जगात जेवढे पाणी आहे तितक्या शुभेच्छा.

















             

Saturday, August 10, 2019

माझी पूर्वपत्नी ऐश्वर्या : एक अपूर्ण स्वप्न

          आज माझ्या पूर्व पत्नीचा म्हणजे ऐश्वर्या कुबल हिचा जन्मदिवस. आज ती हयात नाही. पण तिच्या आठवणी सदैव माझ्यासोबत आहेत. ती जाऊन आता १२ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तिची आठवण रोज मला येते. आज तिची मुलगी म्हणजे आमची मुलगी हर्षदा उर्फ छकुली १२ वीत  शिकत आहे या गोष्टीचा आनंद आहे. ती अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. बोलते तशी, वागते तशी, तिचा माझ्या मुलीला फक्त चारच  वर्षाचा सहवास लाभला. तिची मम्मी तिला सोडून जाताना ती फक्त चार वर्षांची छकुली होती. तिला आपल्या मम्मीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला कधी एकदा बघतो असे झाले होते. पण नियतीला असे घडणे मंजूर नव्हते. गरोदरपणात ८ व्या महिन्यात मुलगा पोटातच दगावल्याने माझी पत्नी असह्य वेदना सहन करत होती. शेवटी डॉक्टरच हतबल झाले. त्यांनी हात टेकले. त्यांच्याने पुढील उपचार करताना होणारा धोका आम्हाला समजावून सांगितला. पण आम्ही बाळ गेले तरी आपली पत्नी व्यवस्थित असेल या भावनेने डॉक्टरांना धन्यवाद देत राहिलो. डॉक्टर आम्हाला दिलासा देत होते. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून होतो. पण डॉक्टर देव नसतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या समोर अखेरचा श्वास घेताना माझी ऐशू माझ्याशी शेवटची बोलत होती. तिला अतिशय घाम आला होता.
          तिला समजले कि आता मला जगणे शक्य नाही, तिला रक्तदाबाने घेरले. अतिशय कमी रक्तदाब असल्याने तिने आपले डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केले , पण व्यर्थ.....तिचे प्राण निघून गेले होते....परत पुन्हा न येण्यासाठी. ....मी एकटा पडलो होतो...सात वर्षे जिने मला अतिशय प्रेमाने साथ दिली ती माझी प्रिय पत्नी अखेरच्या घटका मोजत होती. ते पाहत असताना मी पुरता ढासळून गेलो होतो. मी..तेव्हा मी राहिलो नाही....अक्षरशः वेड्यासारखा बरळत राहिलो. डॉक्टरांना काहीबाही बोललो...तेव्हा माझा राग अतिशय अनावर झाला होता...मी पिसाळलेल्या माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर जे बडबडत होतो ...ते आता आठवले तरीही माझा थरकाप होतो...मला खूप त्रास झाला सत्य स्वीकारायला. पण अखेर सत्य स्वीकारणे भाग होते. माझ्या मुलीचा चेहरा मला दिसू लागला. तिला जेव्हा आपला भाऊ गेल्याचे समजले तेव्हा मी तिला कसे तरी समजावून सांगितले...म्हणालो, बाळा, तुझा भाऊ  खूप चांगला होता , पण तो देवाला आवडला असेल म्हणून त्याने त्याला आपल्याकडे नेले.....हे सांगितल्यानंतर ती एवढी रडली कि म्हणाली...पप्पा, मला माझा भाऊ हवा होता हो...माझ्याशी खेळायला तुम्ही मला भाऊ आणून देणार होतात ना ? मग मी आता कोणाशी खेळू ? गेले आठ महिने मला तुम्ही मला बाळ येणार ...बाळ येणार म्हणून सांगत होतात ...मग असं कसं  झालं ?  ....आणि तिला समजावताना माझ्या नाकी नऊ आलेल्या...आता तर तिची मम्मा देखील हे जग सोडून गेली होती...आता हे तिला कसं  सांगायचं ?  ....मन घट्ट केलं आणि तिला म्हणालो, बाळा, आपलं बाळ गेलं देवबाप्पाकडे....मग त्याला सांभाळायला कोण ? त्या बाळाला सांभाळायला तुझ्या मम्मीला देवबाप्पाकडे जावं लागलं....हे ऐकल्यानंतर तिने जो हंबरडा फोडला होता....तो मला आज आठवतो आणि हा लेख लिहितानाही माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.....खूप कठीण काळीज केलं आणि माझ्या प्रिय पत्नीचं जाणं गिळून टाकलं...ठरवलं कि आता मला माझ्या मुलींसाठी छकुलीसाठी जगायचं आहे...तिच्याशी नंतर वर्षभर मी इतकी मैत्री केली कि ती आपल्या मम्मीला विसरली...त्यासाठी मला तिची मम्मा आणि पप्पा या दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या.आता मी दुसरे लग्न करून चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न  करत आहे.  दुसरी पत्नीदेखील जीवापाड प्रेम करणारी मिळालीय. पण तरीही कधीतरी अनेक प्रश्न मनात  काहूर आणून जातात...मग मी काही क्षणांसाठी फक्त आणि फक्त माझ्या ऐश्वर्याचाच होऊन जातो. आज माझ्या पूर्व पत्नीच्या मृतात्म्यास शांती लाभावी म्हणून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 


Thursday, August 8, 2019

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथ

                                                आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथ - भाग १
          आज आमच्या बाबांचा वाढदिवस . ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्याच दिवशी आमच्या घरात एक क्रांतिकारक जन्माला आले. आमच्या आयुष्यात क्रांती घडवणारे अनोखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले तो हाच दिवस. आमचे बाबा आता ७४ वर्षांचे झाले. मला समजायला लागल्यापासून आमच्या सर्वांवर अतिशय प्रभाव असणारे आमचे बाबा अजूनही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरली. आमचे पिरगळलेले कान  याची साक्ष आहेत. आमच्या पाठीवरील दिलेली प्रेमाची थाप आमच्या  अंगावर एक एक मूठ मांस चढवत गेलेली. त्यांनी दिलेला आश्वासक प्रत्येक शब्द त्यांनी पाळला . आज आपण शब्द देतो, पण किती पाळतो. परंतु बाबा शब्दाला पक्के. त्यांनी एकदा शब्द दिला कि काहीही झाले तरी , त्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील पण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ. त्यांनी कधी कशात माघार नाही घेतली. सर्व कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत असा त्यांचा दंडक अजूनही आहे.
          त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे. त्यांनी आम्हाला नेहमी पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कधी मागे ओढले नाही. आम्ही अभ्यासात नेहमी पुढे असावे यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका धरत. कधी कधी आम्हीच घाबरत घाबरत आमचे प्रगतीपत्रक दाखवत असू. चांगले गुण  मिळूनसुद्धा  ते प्रगतीपत्रक दाखवताना पोटात भीतीचा भलामोठा गोळा येई. आता बाबा काय म्हणतात कोण जाणे.पण त्यांनी आमच्याकडे पाहिलेली प्रेमाची नजर आमची भीती पळवून लावी. आम्ही मग सर्वजण त्यांच्या मांडीवर बसून स्वर्गसुख घेत असू. त्यांची मांडी आमच्यासाठी राजाची गादीच असे. कारण त्यावर बसायला मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यावर मी बऱ्याचदा हक्क सांगत असे. त्यावरून आम्हा पाच भावंडांमध्ये वाद होत. पण मी काही केल्या माझे आसन सोडण्यास तयार नसे. शेवटी मी विजयी मुद्रा करून त्यांच्या मांडीवर ठाण  मांडून बसत असे आणि मी कसा जिंकलो आणि बाकी कसे हरले याचा आनंद घेत असे. म्हणून मी त्यांचा लाडका होतो असे नाही. त्यांना आम्ही सर्व भावंडे लाडकीच होतो. कोणालाही त्यांनी कधी कमी स्थान दिले नाही. माझा छोटा भाऊ , आम्ही मोठी भावंडे त्याला न्हानू म्हणतो. त्याच्या उचापती करण्यामुळे त्याला बऱ्याचदा बाबांचा मार खावा लागला आहे. त्याच्यावर आईचे जीवापाड प्रेम होते. त्याला अचानक आकडी येत असे. तो रागाने आपले डोके भिंतीला किंवा जमिनीला आपटून घेत असे. त्यामुळे त्याला आईकडून कमरेवर घेऊन भरवणे होत असे. बाबा त्याला जवळ घेऊन समजावत असत. पण एकाच दिवसात तो ते विसरून जाई आणि आपल्या खोड्या सुरूच ठेवी. त्यामुळे त्याला प्रसाद मिळे. मार खाऊनही त्याला पुन्हा खोड्या करणे जमत असे. त्यामुळे त्याला बाबांची भीती वाटे. आपण कोणतीही गोष्ट केली तर बाबा आपल्यावर रागे भरतात असा  त्याचा समज त्यामुळे अधिक दृढ होत गेला. आता मात्र तो बाबांसाठी जे काही करतो आहे, ते बघून आम्हाला आमचा पूर्वीचा न्हानू आठवतो आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. कारण आता आमचा न्हानू खूप ग्रेट झालेला आहे. त्याने फक्त बाबांबद्दल गैरसमज असतील तर ते घालवून शुद्ध व्हावे. कारण काहीही झाले तरी बाबा आपल्याला आपल्या  हिताचेच सांगतात. न्हानूच्या नोकरीसाठी बाबानी केलेले प्रयत्न आणि त्यावेळी त्यांची होणारी घालमेल मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. बाबांनी आम्हा सर्वांना सुखात साथ दिलीच, पण दुःखात  ते आमच्या जास्त सोबत राहिलेले आहेत.
          मला डी एड ला पाठवण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यामुळे आज मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. आमचे बाबा शिक्षक बनू  शकले नाहीत, काही काळ त्यांनी शिक्षकी पेशाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्यांचे स्वप्न होते कि माझ्या मुलांना मी शिक्षक बनविन. त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले. आज त्यांचे दोन्ही मुलगे शिक्षक आहेत.  बाबा सगळ्यांना शिक्षकच वाटतात. त्यांनी शाळेत शिकवले कमी , पण आमच्या आयुष्यरूपी शाळेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे शिकवले ते शाळेपेक्षाही अधिक लाखमोलाचे आहे. त्यांच्याबरोबर माझे बऱ्याचदा वाद होतात, पण मी चुकीचा आहे हे मला नंतर पटते, पण माझे बोलणे ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. त्यांच्यासारखा मी कधीच होऊ शकत नाही. मी त्यांना बराच त्रास दिलेला आहे, त्यांचे मन दुखावले आहे. आजच्या दिवशी मला या गोष्टीचा त्रास होत आहे. मी बाबांना न दुखावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन . 

Monday, August 5, 2019

नागपंचमीचा सण

नागपंचमीचा सण 
          काल आम्ही आमच्या किर्लोस गावी गेलो होतो.  आमची किर्लोस आता आंबवणेवाडी या नावानेदेखील ओळखली जाते. आमचा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार पडत होता. आमच्या वरवडे कासरल बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाताना दिसत होते. पाण्याचा वेग वाढत चाललेला दिसत होता. तरीही आमची घरी जायची ओढसुद्धा तितकीच वाढत चालली होती.  कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ही  ओढ नागोबासाठी  आणि आमच्या घराच्या माणसांसाठी अधिक होती. नदीच्या पलीकडे आमचा गाव असल्यामुळे काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. मग आम्ही ठरवले कि, गाडी अलीकडेच ठेवून लोखंडी साकवावरून जायचे. 
          आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता  नदी कधी आली ते समजले देखील नाही.  नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला. 
          लांबलचक लोखंडी साकव एकदाचे पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला. शेत छान डुलत होतं . आम्हाला जणू बोलावत होतं . आमचं  स्वागत करत होतं . बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची त्रेधा होत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नाही. 
          आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या  बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लीलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत. आम्ही नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. कोण आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण आहे. 
           घरी आलो. मस्त वाफाळलेला चहा घेतला. आमच्या बाबांनी  बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी  आणला. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होतीच.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.
           बाबानी नागोबाचे पूजन सुरु केले. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य,  दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता.  सुखकर्ता  दुःखहर्ता ,  लवथवती विक्राळा अश्या आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले. नंतर  केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी,  जिलेबी,पापड, वाटाणे- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने  संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या  भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र  येतोच.
           त्यालाही कारण तसेच आहे. बाबांच्या बालपणीची गोष्ट आहे. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे  झाली. आता आजी जेवायला बसली. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी  चाटू लागली. ते माझ्या बाबांनी पाहिले  व आजीवर ओरडले. म्हणाले, आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. सर्व भावंडांनी ते ऐकले व बाबांवरच ओरडायला लागली, ' तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची  वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस.'  हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले आणि मोठ्याने रडू लागले. आजी म्हणाली , ' अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट  भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला  बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांनी उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण  आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच. 
          संध्याकाळी नागाचे विसर्जन केले आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला  देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. सकाळी दुसऱ्यादिवशी आज पाणी वाढलेच होते. कमी होण्याची शक्यता नव्हतीच. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले आणि जीव भांड्यात पडला. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पणिमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत


































होत्या. 

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...