🐀 दारावरचा न्हेल्यानी
आपण राहण्यासाठी एखाद्या शहरामध्ये भाड्याची खोली घेतो. त्यात आपल्याला राहायचे असते. घरातल्या कुटुंबासोबत काही नको असलेले सदस्य आपल्याबरोबर राहायला आलेले असतात. ते पूर्वीपासूनच राहत असतात , फक्त आता आपली त्यांना सोबत झालेली असते इतकेच. मी उंदीर , झुरळे , मुंग्या , कोळी यांच्याबद्दल बोलतोय हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. अर्थात स्वतःचे घर असले म्हणून हे अनवॉन्टेड सोबती यायचे राहात नाहीत , ते कुठूनतरी येतातच. चांगल्या फ्लॅटमध्येही बेसिनच्या खाली झुरळांची ये- जा सुरू असतेच. स्वयंपाकघरातील त्यांचा वावर आपल्याला शिसारी आणणारा असतो.
मुंग्यांनीही बेजार करून सोडलेले असते. जिथे तिथे आपल्या घरात कोळी आपले घर बांधताना दिसतात. हे सगळे कीटक परवडले , पण उंदीर नको. तसे सगळेच कीटक उपद्रवीच असतात. पण उंदीर, चिचुंद्री यांचा उपद्रव अधिक जाणवतो. सीतेला कुटीत एकटी सोडून जाताना लक्ष्मणाने जशी ' लक्ष्मणरेषा ' आखलेली असते , तशी ' लक्ष्मणरेषा ' बाजारातून विकत आणून आपण त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. मग हे अनवॉन्टेड रावण सैरावैरा पळतात आणि त्यांना मारण्यासाठी आपण त्यांच्या मागून सैरावैरा पळतो. त्यांना काठीने मारताना चुकून एखादा घाव आपल्याच माणसांवर किंवा एखाद्या चांगल्या वस्तूंवर करायलाही आपण कमी करत नाही. आपल्यात त्यावेळी कमालीची वीरश्री संचारलेली असते. काही तर उगीचच धावत असतात. शेवटी सगळे हे प्राणी आपल्या आपल्या निवाऱ्यात काही काळ लॉकडाउनप्रमाणे जाऊन राहतात आणि औषधाचा असर संपला की पुन्हा त्यांचे अनलॉक झालेले असते.
आमच्या घरी या उंदरांना पळवून लावण्यासाठी ' पिंजरा ' आणून ठेवलेला असे. उंदरांनी खूपच उच्छाद मांडला होता. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. लोखंडी पिंजऱ्यात जाण्यासाठी एक दरवाजा असे. त्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येत नसे. रात्री आईने त्या पिंजऱ्याच्या दरवाजावर ' हिरवी कोथिंबीर ' लावून ठेवली होती. आम्ही सर्व भावंडांनी आपापली अंथरुणे घातली. नेहमीसारखे गाढ झोपी गेलो. बाबा पडल्यापडल्या घोरायला लागले. मीही त्यांच्या पोटात शिरून झोपलो. आई उशिरापर्यंत जागी असे. ती उद्याची तयारी करून ठेवत असे. तीही झोपली. आज तिला शांत झोप लागली असावी. सकाळी लवकर उठण्याची तिची सवय नव्हती. तिला माझे बाबा उठवत असत. बाबांची तयारी झाली की मग आई उठत असे. बाबांना गडबड असली तर कधीकधी ते आईला लवकर उठवून जेवणाची तयारी करायला सांगत.
पण का कोण जाणे , आज बाबांच्या अगोदर आई उठली होती. उठल्याउठल्या तिने काहीतरी पाहिले असावे. ते पाहताक्षणी ती मोठ्याने बोलली नव्हे ओरडलीच , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " हे वाक्य ती मोठ्याने बोललीच. पण बाबांच्या कानाकडे जाऊन पुन्हा हळू आवाजात बोलली , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " . बाबा तसेच घाबऱ्याघुबऱ्या उठले आणि बाहेरच्या दरवाजाकडे गेले. त्यांनी बाहेरच्या दरवाजाकडे ठेवलेल्या सर्व आपल्या वस्तू पडताळून पाहिल्या. सर्व वस्तू होत्या तश्याच होत्या. घरवालीने उगीचच काहीतरी सांगितले म्हणून तिला ते ओरडण्यासाठी वळले. आम्हीही आईच्या ओरडण्याने जागे झालो होतो. पण अंथरुणातून उठलो नव्हतो. पुन्हा आई ओरडली , " ओ , हकडे येवा , हेनी सगळा दारावरचा न्हेल्यानी " . तेव्हा बाबा स्वयंपाकघरात गेले तर तिथे पिंजऱ्यात एकही उंदीर नव्हता. पण पिंजऱ्याच्या दारावर ठेवलेली कोथिंबीर त्या उंदरांनी पळवली होती. एकही उंदीर त्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. दारावर ठेवलेली कोथिंबीर पळवल्याबद्दल आई तसे म्हणत होती , " ओ , दारावरचा न्हेल्यानी ".
उंदीर एवढे हुशार झाले होते की त्यांना पिंजऱ्यात न सापडता खाऊ घेऊन जाता येत होता. त्यानंतर वेगवेगळे प्रकार करुन उंदरांना पकडण्याचे काम सुरूच राहिले. आजही ' दारावरचा न्हेल्यानी ' या वाक्याला आम्हाला पोट धरून हसू येते. तुम्हालाही हसू आले असेल तर तुम्हीही पोट धरुन हसू शकता. फक्त हसताना तुमचे पोट धरा म्हणजे झाले.
©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

