Thursday, February 29, 2024

🛑 दक्ष राहणारी दक्षता

 🛑 दक्ष राहणारी दक्षता

          माणसं जन्माला येतात, मरुनही जातात. कधीतरी मरुन जाणार हे प्रत्येकाला माहित असतं. माणसाचं मरण कधी येणार हे माहित असतं तर!!! तर माणसाची जगण्याची इच्छाच मरुन गेली असती. मरणार कधी हे माहित नसतं, म्हणून आपण सुखाने जगत राहात असतो.

          काही लोकांचं वय झालेलं असतं. त्यांना त्यांच्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. कंटाळून जगणं हेच त्यांच्या जीवनाचं गणित झालेलं असतं. ज्यांना जगायचं असतं, त्यांना मात्र नियती लवकर का घेऊन जाते ते समजत नाही. जगायची तीव्र इच्छा असते. जीवनाकडे आशेने पाहत असताना अचानक एखादी व्याधी जडते आणि जगण्याच्या उमेदीचेच खच्चीकरण होते.

          दक्षता एक गुणी मुलगी. खेड्यात राहणारी. तिचे कुटुंब अतिशय प्रेमळ. तिचे आई, वडील, बहिण, भाऊ, आजी सगळे दक्षताला जीव की प्राण. तिनेही या सर्वांवर अतिशय जीव लावला. तिला गप्पा मारायला खूप आवडत असे. ती गप्पांमध्ये रंगून जाई. तिचा हसरा चेहरा त्यावेळी अधिक खुलून दिसे.

          तिचं बोलणं, वागणं, मिसळणं, मैत्री करणं लक्षात राहण्यासारखंच होतं. तिची आणि माझी भेट तिच्या वडिलांमुळे झाली. वडील समाजाची सेवा करण्यात आनंद मानणारे. समाजाची सेवा करताना त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार दिले हे विसरून चालणार नाही. आपल्या मुलांना मार्गदर्शन करताना आपल्या समाजातील मुलांनाही मार्गदर्शन करताना ते नेहमीच तहानभूक हरपून जात असतात.

          मुलगी शिकली की पुढे काय करावे हा प्रत्येक बापाला प्रश्न पडतो. दक्षताच्या बाबांनी तिला ब्युटीपार्लरचे शिक्षण देण्याचे ठरवले. एका प्रसिद्ध ब्युटीपार्लरमध्ये ती ' कमवा आणि शिका ' पद्धतीने शिकू लागली. एकदा बघितले की दक्षताला चांगले लक्षात येई. तिने सर्व प्रकारच्या थेरपी लवकरच आत्मसात केल्या. बोलता बोलता तिचे हातसुद्धा सफाईने चालत असत. तिचं बोलणं गोड होतं. त्यामुळे तिच्या हातून ब्युटी थेरपी करायला आलेली महिला कस्टमर खुश होऊन जाई. दिसत असे शिकण्यात सुंदर रितीने निघून जाताना समाधान आणि सुखाचा अनुभव येत होता.

          अचानक दक्षताला त्रास सुरु झाला. तिला कॅन्सर असल्याचे समजले तेव्हा तर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. ती स्वतः मात्र खंबीर होती. तिने धीटपणे दुर्धर व्याधीला पळवून लावण्याचे ठरवले होते. तिच्या वागण्या - बोलण्यात काहीच फरक जाणवत नव्हता. ती जशी पूर्वी होती, तशीच हसरी मुद्रा घेऊन समोर येई. तिचे दुःख तिने स्वतःच सूर्यासारखे गिळून टाकले होते. कर्करोगाला पळवून लावण्याचं धारिष्ठ्य करणारी दक्षता अजिबात हार मानायला तयारच नव्हती.

          ती आली की हसतमुखाने यायची. तिची लहान मुलांशी लगेच मैत्री व्हायची. मग तिच्या अमर्याद गप्पा सुरु होत. ती मनुष्यवेल्हाळ होती. तिला माणसांमध्ये राहायला खूप आवडे. तिने एकदा मैत्री केली की कायमची. तिच्या अनेक मैत्रिणी होत्या, तसे मित्रही. तिची मैत्री निरागस होती.

          बऱ्याचदा तिला केमोथेरपीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागे. तिथल्या स्टाफबरोबर तिने मैत्री केली होती. केमोमुळे तिचे केस जाऊ लागले होते. ब्युटी थेरपी करणारी मुलगी केसांच्या गळण्याने डगमगली नाही. तिने निकराने प्रतिकार केला. ती आली की तिचा निस्तेज झालेला चेहरा पाहून काळीज आतून चर्र होई. ती आपल्या त्या जीवनावर अजिबात नाखुश नव्हती.

          त्यादिवशी तिला ताप आला होता. ताप आला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. डॉक्टर उपचार करण्यासाठी पुन्हा लांबच्या हॉस्पिटलमध्ये नेणे भाग होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तिला होणारा त्रास असह्य मानसिक वेदना देत होता. हॉस्पिटलाईज करुन सुद्धा तिच्या तब्येतीत काहीच चांगला फरक पडत नव्हता. तिचे शरीर निश्चल पडू लागण्याची लक्षणे डॉक्टरांनाही दिसू लागली होती. तिचा हसरा चेहरा हळूहळू शांत शांत होत जाऊन कायमचा शांत झाला होता. तिचे हसणे आता पुन्हा कधीही पाहता येणार नव्हते. कायमची दक्ष असणारी दक्षता खूप खूप दूर निघून गेली होती.

©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...