सरकारने २००५ नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ' कुटुंब निवृत्ती योजना ' पुनरुज्जीवित केली आहे. तशीच ' जुनी पेन्शन ' सुरु करावी ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेली हक्काची मागणी अजून प्रलंबित ठेवली जात आहे.
मी एक पदवीधर शिक्षक आहे. कोरोना काळात शाळा बंद असतानाही मी चेकपोस्टवर जास्तीत जास्त वेळा ड्युटी केलेली होती. शिकवणेही सुरु होतेच. कामाचे सहा तास असताना चोवीस तास काम करावे लागत होते. मुलं अंतर ठेवून शिकत होती , तरीही शिक्षण सुरु होते. आज मात्र मी शाळेत नाही. संपात सहभागी आहे. त्यामुळे मुलांच्या पासून दूर झालो आहे. मुलांवर त्याचा कितपत परिणाम झाला आहे हे सांगू शकत नाही. पालकांवर किती परिणाम झाला आहे हेही मला सांगता येणे कठीण आहे. घरात बसून संपाच्या संदर्भातील बातम्या बघण्याचे काम नित्याचे झाले आहे. त्याचाही कंटाळा आलाय. काय करावे ते समजत नाहीय. अजून किती दिवस संप सुरु राहील याचाही अंदाज बांधता येत नाहीय.
मी २००५ पूर्वी नोकरीला लागलेला शिक्षक आहे. मला पेन्शन मिळणार याबद्दल खात्री आहे. पण २००५ नंतर आणि पुढेही नोकरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी संपल्यानंतर न मिळणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेविषयीबद्दल असलेला हा लढा आहे. कधीकधी लढा दिल्याशिवाय मागण्या मान्य होत नाहीत. म्हणून नाईलाजास्तव संपाचे हत्यार उपसावे लागते. लोकांचे , मुलांचे , रुग्णांचे होणारे हाल बघून व्यथित व्हायला होत आहे. बातम्या बघता बघता डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. संपकऱ्यांच्या अंगात कंप येऊ लागलाय.
घरात कधीही निवांतपणे न बसणारे माझ्यासारखे अनेक सरकारी कर्मचारी हवालदिल झाले असतील अशी मी कल्पना करतो आहे. पेपर वाचूनही संपला आहे. पुस्तके वाचायलाही मन लागत नाहीय. शाळेतील मुले बंड करुन डोळ्यासमोर उभी राहिली की काय करावे तेच समजत नाही. बायको , मुले आणि कुटुंबातील सर्वांनाच आपण पूर्वीसारखेच हसतखेळत आहोत असा खोटा अभिनय करावा लागतोय. सामाजिक उपक्रमात भाग घेतानाही कधीतरी एका क्षणी मन सुन्न एकाकी बनू पाहत आहे. घरातले काय बोलत आहेत , त्याकडे नीटसा लक्षही नाही. त्यांचं बोलणं कानावर आदळलं की तो डीजेचा आवाज वाटत आहे. शिक्षक म्हणून नेहमी आपल्याला बोलण्याची सवय. आताशा मला सर्वांचं ऐकावं लागत राहण्याची जणू शिक्षाच मिळाली आहे असंही वाटतंय. संप संपेपर्यंत माझ्यासारखा विचार करणाऱ्या शिक्षकांचे काय होईल माहिती नाही. संयम सुटत चाललेला नसला तरीही सहनशक्ती कमी होत चालली आहे. त्याचं रुपांतर गप्प गप्प राहण्याकडे जाईल अशीही भीती वाटतेय.
कोणीही सोबत नसलं तर आपला मोबाईल आपली साथ करतो. सध्या तोही गपगार झालाय. त्याला स्वीच ऑफ ठेवून ' डिजिटल उपास ' करावा असाही एक विचार येऊन जातोय. मुख्यमंत्र्यांच्या खचाखच भरलेल्या सभा टीव्हीवर पाहताना ते आमच्या संपाचा विचार करत असावेत का ? असाही प्रश्न पडलाय. संपाबद्दलची अनेकांची नकारात्मक विचारसरणी ऐकून ऐकून कान बहिरे होऊ पाहत आहेत. काय ऐकावं तेच कळेनासे झालेय. रडू येतंय , पण डोळ्यांतून एक टिपूस पाणी येईल तर शपथ !! झोपही धड लागत नाहीय. झोप लागलीच तर स्वप्नातही संपाची धडधड सुरु आहे. अचानक जाग आलीच तर पुन्हा संप सर्व शरीर कंपित करत आहे.
५४ दिवसांचा संप करणाऱ्या आमच्या पहिल्या पिढीतील कर्मचाऱ्यांचा इतिहास पाहिला तर तो आम्हांला थक्क करुन सॊडणारा आहे. त्यांच्यात एवढा संयम कोठून आला असावा ? हा संयम आमच्यात का नाही ? आम्ही आजची पिढी का इतक्या लवकर ढेपाळतोय ? त्या शिक्षकांनी आमच्यात स्वाभिमान पेरला होता. त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. तरीही त्यांच्याइतके आम्हांला संयमाने नक्कीच जगता येणं कठीण आहे. सगळे लोक पगाराच्या नावाने बोलत सुटले आहेत. किती दिवस , किती सुट्ट्या यांचा हिशेब घालून दाखवू लागले आहेत. सरकारी नोकरी करणं ही अवघड गोष्ट नसली तरी सोपी नाही हे यांना कोण सांगणार ? आलेल्या आदेशांचे पालन करत राहणं हेच आयुष्यभर करत राहणारे आम्ही , स्वतःचं घर , कुटुंबही विसरत चालतो आहोत. सरकारसाठी प्रामाणिकपणाने नोकरी करायची आणि सर्वांचं बोलूनही घ्यायचं असं सध्या सुरु आहे. हे कधीही न संपणारं आहे. नकारात्मक आणि आम्हाला लागेल असे बोलणाऱ्यांना बोलताना काहीच वाटत नाही. कदाचित त्यांच्या घरी एकही शासकीय कर्मचारी नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना असं बोलणं सुचू शकतं.
काहीही झाले तरी आमच्या अठरा लाखांची संख्या असणाऱ्या सर्व संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या कायम ऋणात राहायला हवे. ' काम नाही तर दाम नाही ' असे शासनाच्या म्हणण्यानुसार दररोजच्या आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडणाऱ्या सर्वांना माझा मानाचा मुजरा.
© प्रवीण अशितोष कुबल ( कणकवली )
