🛑 खेळ नियतीचा
आपल्या जीवनात आलेली प्रिय व्यक्ती अकस्मात कायमची निघून जाण्यासारखी वाईट गोष्ट या जगात दुसरी कुठलीही नसेल. कल्पना नसताना एखादी घटना घडते आणि संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याचा अनुभव येतो.
प्रिय व्यक्तीचे अकाली निधन झाले असेल तर काय होत असेल याची मला स्वतःला अनुभूती आलेली आहे. त्यामुळे माझ्यासारखंच संकट एखाद्यावर आलं तर मी पुन्हा माझ्या त्या काळात जातो.
हल्ली सर्रास प्रेमविवाह होत असतात. प्रेम करुन मग लग्न केले जाते. पूर्वी तसे नव्हते. आधी लग्न केले जायचे , मग प्रेम करावे लागायचे किंवा प्रेम निर्माण व्हायचे. त्यावेळी जुळणाऱ्या रेशीमगाठी मजबूत होत्या हे तितकंच खरं आहे. आताही प्रेम करुन लग्न केलेली जोडपी सुखात नांदताना आपण पाहतो. अपवादात्मक घटस्फोट होतानाही पाहतो. एक कवी आपल्या कवितेत म्हणतो ते अगदी खरं आहे , " प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे , प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं. "
तीन वर्षांपूर्वी आमच्या नातेवाईकांच्या जवळच्या नातेवाईकांकडे असाच विवाह झाला. नवरा नवरी आनंदात संसार करु लागली होती. लग्न झाल्यानंतर दोनच वर्षात त्यांच्या घरी नवीन बाळ येणार अशी चाहुल लागली होती. दांपत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आनंदाला उधाण आलेले असताना अचानक आयुष्यात वाईट घटनाही घडू शकते याची आपल्याला जाणीवही नसते. नियतीने आपला क्रूर खेळ खेळायला सुरुवात केली होती. एवढा क्रूर खेळ की तिने एका बरोबर दुसऱ्याचं आणि अनेकांचं आयुष्यच उध्वस्त करुन टाकलं होतं. या उद्ध्वस्त आयुष्याचे काय करायचे हा प्रश्न पडला की आपलं जीवनच संपवून टाकावं असे वाईट विचार आले तर त्यात नवल ते काय ?
' छान चाललंय आमचं ' असं म्हणत असतानाच सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली होती. नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. पत्नी गरोदर असल्यामुळे तिला ही गोष्ट सांगायची कशी ? सांगितली तर तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे काय होईल ही भीती होतीच. शेवटी सांगावेच लागले होते. आपला प्रिय नवरा आता या जगात जिवंत नाही ही गोष्ट ऐकताच कोणतीही प्रेम करणारी बायको मूर्च्छित झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी तसेच झाले होते. पोटातल्या बाळासह मलाही हे जग सोडून माझ्या प्रिय नवऱ्याकडेच जायचे आहे असे त्यावेळी तिला वाटायला लागले होते.
ती स्वतःला दोष देत राहिली होती. तिने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळाकडे बघूनही ती आपले दुःख विसरु शकली नव्हती. तिला तिचा नवराच हवा होता. तिच्या नवऱ्याने त्या बाळाच्या रुपाने एक आपली आठवण भेट तिला कायमची प्रदान केली होती. नियतीने नवरा हिरावून घेऊन गोरागोमटा मुलगा दिला होता. इथे नियती चांगली वागली असली तरी त्या आईला हे अजिबात मान्य नव्हतं.
मांडीवर आपल्या रक्ताचं तान्हं बाळ असतानाही तिच्या मनात अनेक वाईट विचार येतच राहिले होते. स्वतःला त्रास करुन घेण्याचं प्रमाण नवऱ्याच्या तीव्र आठवणीगणिक वाढतच चाललं होतं.
पतीच्या आयुष्यातून पत्नी कायमची निघून गेल्यानंतर काय अवस्था होते ही माझी गोष्ट मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण ती आपल्या दुःखाला कवटाळूनच बसलेली दिसत होती. तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले होते. तिने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली होती. सांगताना तिचे रडणे सुरुच होते. डॉक्टरांनी तिच्याशी छान सुसंवाद साधला होता. तिने स्वतःला संपवण्याचे केलेले प्रयत्न असफल ठरत होते ही मात्र चांगली गोष्ट घडत होती. तिच्या तान्ह्या मुलासाठी जगणं हेच तिचं आता जीवनाचं ध्येय बनायला हवं असं आम्हा सर्वांना वाटतं आहे.
तिचा नवरा आठवणींच्या रुपात तिच्यासोबत आहे अशा भावना सदैव मनात ठेवून आपल्या बाळासाठी ती नक्कीच जगेल अशी आशा करण्यापलीकडे आम्ही काहीही करु शकत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबल
पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१
.jpeg)