Tuesday, August 2, 2022

🛑 गणपतीची शाळा

🛑 गणपतीची शाळा

          दर नागपंचमीला आम्ही घरी किर्लोसला जातो. आज नागपंचमीला मी माझ्या कुटुंबासह घरी आलो. जुन्या सर्व आठवणी प्रत्येक पावलाला येत होत्या. छोट्या उर्मीला गृहपाठ म्हणून नागोबाचे चित्र रेखाटून दिले. तिनेच सांगितले , " पप्पा , मला आमच्या घरातल्या भिंतीवरचा नागोबा काढून द्या. " पूर्वीच्या घरी भिंतीवर दरवर्षी नागोबा काढला जात असे. जमिनीवर चुन्याची रांगोळी काढली जाई. माझी मोठी आत्या छान रांगोळी काढत असे. गावाकडे या रांगोळीला ' कणे ' असा शब्द वापरत. मालवणीत त्याला ' कनो ' असेही म्हणत. सुंदर रांगोळी बघत राहावीशी वाटे. स्वच्छ आणि पांढरीशुभ्र रांगोळी हिरव्यागार शेणाने सारवलेल्या जमिनीवर उठून दिसत असे. चुन्यात तीन बोटे बुडवून त्यातून तयार झालेली ती कलाकृती असे. याच चुन्याच्या रांगोळीपासून भिंतीवर ' नागोबा ' काढला जाई. आता असे चुन्याचे नागोबा क्वचित पाहायला मिळत असावेत.

          सिमेंटच्या घरांमुळे टाईल्सचे रेडिमेड नागोबा भिंतीवर चिकटले आहेत. ते तसेच दरवर्षी दिसत राहतात. त्यात कोणताही जिवंतपणा दिसत नाही. 

          आम्ही लहानपणी आमच्याच गणपतीच्या शाळेत नागोबा बनवत असताना जी मज्जा केली आहे ती आताच्या मुलांना अनुभवायला मिळते आहे. आमचा मयुरेश आणि उर्मी दोघेही मातीचे नागोबा करण्यात दंग होऊन गेले आहेत. बाबा , काका आणि माझा भाऊ गणपतीच्या मूर्तींवर शेवटचे हात फिरवत आहेत. यंदा आमच्या शाळेत पस्तीस गणपती तयार करुन झाले आहेत. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी गणपतीचे पाट आणून ऑर्डर देण्याची जुनी पद्धत आहे. ती अजूनही तशीच सुरु राहिली आहे. आमच्या सर्व मूर्ती शाडूच्या मातीच्या असतात. मातीची किंमत महाग झाल्याने मूर्ती स्वस्त देता येणे शक्य नाही. ज्यांना परवडत नाही ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हलक्या मूर्ती असलेल्या शाळांची वाट चोखाळतात. पण या मूर्ती पर्यावरण पूरक नसतात हे त्यांना कुणी सांगायचे ? 

          गणपतीची शाळा चतुर्थीपर्यंत कायमस्वरूपी उघडलेली असते. आपला तयार होत असलेला गणपती पाहायला लोक येत राहतात. त्यात काही बदल करावयाचा असल्यास सुचना करत राहतात. बिचारे आमचे मूर्तीकार काका त्यांचे ऐकून त्याप्रमाणे करायला नाईलाजाने तयार होतात. आम्हाला प्रत्येकाला सुबक मूर्ती द्यायची असते. गेली पन्नास साठ वर्षे ही मूर्तीकला जोपासणारे माझे कुटुंब आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. गणपती रंगवताना तर रोजची गर्दी असते. दुसऱ्या गणपतीपेक्षा आपला गणपती सरस दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते.

          पूर्वी पार्वती गणपती , शंकर पार्वती गणपती , गाय गणपती , राधाकृष्ण,  वाघावर , सिंहावर , उंदरावर , गरुडावर बसलेला गणपती , सिंहाचा जबडा उघडणारा गणपती , शिवाजी , राक्षसाला मारत असलेला गणपती , राम लक्ष्मण सीता , दत्ताचा अवतार , कंसवध , शेष गणपती , मयुरेश आणि असे अनेक प्रकारचे गणपती असत. आता हे प्रमाण कमी झाले आहे. साईबाबा , बालगणेश , कमळातील , फुलातील गणपती , सिंहासनाधिश्वर , फेटेवाला , उभा गणपती , लालबागचा गणपती , टिटवाळा गणपती , दगडूशेठ , चिंतामणी , बाहुबली , मंगलमूर्ती असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात. ग्राहकांना स्वस्त आणि मस्त गणपती हवा असतो. काही हौशी ग्राहक किमतीकडे बघत नाहीत. तुम्ही सांगाल ती रक्कम न बोलता निमूटपणे देतात. नारळ , विडा ठेवून नेहमीची रक्कम ठेवली जाते. वाढलेली जादा रक्कम मूर्तिकाराच्या हातात दिली जाते. काही गरीब हौशी ग्राहकांच्या मनात असूनही चतुर्थीला गणपतीचे पूर्ण पैसे देणे त्यांना जमत नाही. त्यांचा गणपती पाण्यात गेला तरी पैसे जमा व्हायचे बाकीच असतात. मूर्तीकारांना हा आर्थिक फटका बसत असला तरी गणपती त्यांना सुखात ठेवतो हे अगदी खरे आहे. त्याचे अकरा दिवस तरी मजेत जातात. 

          श्रावण महिना पाळणारे लोक केस दाढी करत नाहीत. त्यामुळे आमच्या सलूनमध्ये कमी काम असे. त्यामुळे गणपतीची शाळा सुरु ठेवणे हे बाबांना अतिशय गरजेचे बनले होते. एका वर्षी तर आमच्या पाच ठिकाणी ' गणपतीच्या शाळा ' होत्या.  त्यावेळी बाबांची आणि काकांची जी धावपळ चाले ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. 

          आमचा ' घरचा गणपती ' आमच्याच शाळेतला असे. तो नेहमीच मोठा असे. सोबत देखाव्याची चित्रे बाबा बनवत. ट्रिक सिन नसला तरी शेजारच्या गावातील शेकडो गणपतीप्रेमी आमचा गणपती मुद्दाम पाहण्यास येत. कधी अकरा दिवस , कधी एकवीस दिवस आमच्या घरातील जल्लोष संपता संपूच नये असे वाटत राही. 

          इंग्रजी शाळांमुळे जशी जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची पटसंख्या कमी झाली आहे , तशीच पिओपीच्या मूर्तीशाळांमुळे आमच्यासारख्या पर्यावरणपूरक गणपतीच्या शाळांमधील गणपतींची पटसंख्या कमी कमी होत चालली आहे ही प्राथमिक शाळांसारखी गणपती शाळांचीही शोकांतिका आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.









💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...