Sunday, October 3, 2021

जित जायेंगे हम , अजित जब संग है

 🛑 जित जायेंगे हम , अजित जब संग है


          माझ्या आयुष्यात अशी कितीतरी माणसे आली आहेत. त्या प्रत्येकाने आपल्या आगळ्यावेगळ्या कर्तृत्वाचा ठसा माझ्यावर उमटवला आहे. लहानपणापासून अशांची सोबत मला लाभली हे माझे भाग्यच. पहिली ते सातवीपर्यंत आम्ही एकाच शाळेत शिकलो. नंतर शिक्षणासाठी ताटातूट झाली. आम्ही एका वर्गात नसलो , तरी एका शाळेत होतो. एक उमद्या व्यक्तिमत्त्वाचा मुलगा सतत आम्हाला प्रेरणा देत होता. लहानपणी त्याच्या असण्याने आम्ही भारावून जात होतो. त्याच्या केवळ समोर येण्याने आमच्या अंगात स्फुल्लिंग येत असे. आमच्यापेक्षा दोन तीन इयत्तांनी पुढे असेल तो. पण त्याच्याबद्दल आमच्या शाळेतील प्रत्येकाच्या मनात आत्यंतिक आदर होता. त्याचे नावच अजित होते. तो आला , तो बोलला आणि त्याने संपूर्ण रंगमंच जिंकून घेतलं. आमचं बालमन त्यानं कधीच लिलया काबीज करुन टाकलं होतं.

          त्याचं आडनाव बिडये. कणकवलीत महापुरुष मंदिराजवळ राहणारा गोरा गोंडस पोरगा. भालचंद्र महाराज विद्यालय म्हणजेच कणकवली तीन नंबर शाळेचा तो बाल कथाकथनकार होता. आमचे मुख्याध्यापक जॉन दियोग रॉड्रिग्जगुरुजी यांचा तो सर्वात लाडका विद्यार्थी होता. त्यावेळी मुख्याध्यापकांचा लाडका असलेल्या मोजक्या मुलांमध्ये तो वरच्या क्रमांकावर असेल. परिपाठ सुरु झाला कि आम्ही घाबरत घाबरत समोर बसत असू. गुरुजी कधी कोणता प्रश्न विचारतील याचा नेम नसे. परिपाठ सुरु असताना आम्ही तीनशेपेक्षा जास्त मुले अगदी शांत चित्ताने परिपाठाला बसलेले असू. गुरुजींच्या आदरयुक्त भीतीमुळे आम्ही गप्प बसत असू. ते आम्हाला मारत नसत , पण त्याचं विशाल व्यक्तिमत्त्व आम्हाला गप्प राहण्यास आपोआप भाग पाडत असावे. अचानक गुरुजी ' चला अजितराव ' असे म्हणत आणि आमच्या अजितची स्वारी नवीन गोष्ट सांगायला सराईतपणे समोर आलेली असे. 

          या अजितने आम्हाला सलग दोन ते तीन वर्षे अनेक गोष्टी सांगितल्या. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या तरी आम्हाला त्याच्या तोंडून ऐकायला त्या आवडत असत. त्याची कथा सांगण्याची पद्धत लाजबाब होती. हावभाव करुन त्यात सजीवपणा आणण्याचे काम आमचा अजित करत असे. वाचिक अभिनय त्याला बालपणापासूनच ज्ञात असावा. अणावकरगुरुजींकडे आमच्या अजितने कथाकथनाचे बाळकडू घेतले. अजित कधीही लाजाळू नव्हताच. त्याचे नाव घेतले की तो कथा सांगायला विजेसारखा उठत असे. त्यांच्या अंगात कथा संचारलेली असे जणू. कोणतीही साधी गोष्ट असली तरी त्याचे कथेत रूपांतर करण्याची अवघड कला त्याला जमे. आम्ही त्याच्या कथेची कायम वाट पाहत राहू. 

          त्याच्यासोबत दुसऱ्या शाळेतली एक मुलगी कथाकथन सराव करण्यासाठी येई. तिचे नाव वर्षा करंबळेकर असे होते असे आठवते. तीही भन्नाट कथा सांगे. त्यामुळे अजित आणि वर्षा या दोघांमध्ये कथाकथनाची जणू नियमित स्पर्धाच लागे म्हणा ना ! हा अजित आमच्या जवळ येऊन बसला तरी आम्हाला खूप बरे वाटे. एक उत्कृष्ट गोष्ट सादर करणारा मुलगा आमच्या शाळेत शिकत आहे , या गोष्टीचा आम्हाला अतिशय अभिमान होता. तो जेथे जाई , तेथे कथाकथनाचे बक्षीस घेऊनच येई. भर परिपाठात गुरुजी त्याची पाठ थोपटत , तेव्हा कधीकधी आम्हाला त्याचा हेवाही वाटे. आपल्याला या अजितसारखे होता येईल का ? त्यांच्यासारखी गोष्ट सांगता येईल का ? असे प्रश्न पडत. पण अजित तो अजित. त्याच्यासारखा तोच. त्याची कथाशैली ऐकत राहावी अशीच होती. थंडीच्या दिवसातही त्याची कथा ऐकताना आम्हा मुलांना बौद्धिक ऊब मिळून जाई. त्याच्या कथाकथनामुळे आमचेही व्यक्तिमत्त्व आकार घेऊ लागले होते. आज मी शिक्षक म्हणून काम करत असताना त्याच्या त्या वेळच्या भाषेचा माझ्यावर नक्कीच संस्कार झाला असणार याबाबत मला अजिबात शंका येत नाही. 

          1988 पासून मी एस. एम. हायस्कुल मध्ये शिकत असताना या अजितची आठवण येई. तो मात्र अजिबात थांबला नव्हता. त्याचे कथाकथन सुरुच राहिले होते, फक्त त्याचा लाभ आम्हाला मिळेनासा झाला होता. त्याची कधीतरी भेट होईल असे वाटत होते. पण तो बरीच वर्षे भेटलाच नव्हता. 1996 मध्ये मला नोकरी लागली. अजित मला भेटला नाही. त्याची मोठी बहीण सुजाताताई माझ्या मोठ्या बहिणीच्या ताईच्या वर्गात शिकत होती. त्यामुळे तिचे आमच्या घरी येणे जाणे असे. पण नंतर ती अचानक हे जग सोडून गेल्याचे समजले आणि धक्काच बसला होता. नोकरीच्या व्यापात नवीन मित्र झाले. जुने मित्र नोकरीच्या शोधात विविध ठिकाणी गेले. अजितने मधल्या काळात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तो एक प्रथितयश इंजिनियर झाला. त्याने अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. पण तेथे त्याचे मन रमेना. त्याने महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. आज हा अजित सिंधुदुर्गातील विविध प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये अकरावी , बारावीच्या मुलांना विज्ञान शाखेतील महत्त्वाचे विषय शिकवत आहे. 

          मी वैभववाडीत असताना निवडणूक ड्युटी लागली होती. मी एका बुथवर अधिकारी म्हणून होतो. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका शिक्षकाचे नाव ' अजित बिडये ' असे होते. पण तरीही माझ्या लक्षात आले नव्हते की हे ' अजित बिडये ' म्हणजे आमचा गोष्टीवेल्हाळ अजित होता ते. जेव्हा खरेच या अजित सरांची प्रत्यक्ष भेट झाली , तेव्हा मी त्यांचा अधिकारी आहे याबद्दल मलाच कसेतरी झाले. एक सफारी घातलेले प्राध्यापक म्हणजेच अजित बिडयेसर माझ्याबरोबर अगदी लहानपणीसारखे बोलू लागले. त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता कधी वेळ निघून गेला समजलेही नाही. ते दोन दिवस आम्ही दोघे अतिशय मजेने कामकाज केले. त्यावेळीही आमचा हा अजित आता मोठा प्राध्यापक झालेला असला तरी मला त्यावेळी आमच्या तीन नंबर शाळेत कथा सांगणारा छोटा अजितच वाटत होता. किती वर्षे निघून गेली होती. किती वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो होतो. पण त्या लहानपणीच्या आठवणी किती ताज्या झाल्या होत्या. माझ्या सोबतीला माझा लहानपणीचा मित्र असा अचानक येईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. आज हा अजित कितीही मोठा प्राध्यापक झाला असला तरी त्याचा स्वभाव अगदी पूर्वीसारखाच आहे , नेहमी हसतमुखाने सामोरा जाणारा. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...