🟢 इलास , कधी इलास
शिक्षण आणि प्रतिभा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षणाने प्रतिभा येऊ शकते. प्रतिभेमुळे शिक्षण घडू शकते. कमी शिक्षण असलेले प्रतिभावंत असलेले आढळून आलेले आहेत. जास्त शिक्षण घेतलेल्यांच्या अंगी प्रतिभा असेलच याची खात्री देता येत नाही. माणसाच्या अंगी असलेली ही प्रतिभा कधी लवकर लक्षात येते , तर कधी लक्षात यायला वेळ लागतो. ' हाडाचा शिक्षक ' , ' हाडाचा कवी ' अशी उपमा दिली जाते. सगळी माणसे हाडाचीच बनलेली असतात. पण ' हाडाचा ' हा शब्द त्यांच्यातल्या प्रतिभावंतासाठी वापरलेला असतो.
बहिणाबाई चौधरी या प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांना स्फुरत असणाऱ्या कविता त्या म्हणत असत. त्यात असणारा अर्थ डोळ्यातून पाणी आणणारा असे. त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईची प्रतिभा जोपासली. त्यांच्या कवितांचे लेखन करून त्या जगाला दिल्या. जगाला जगण्यासाठीचे अमृत बहिणाबाईंच्या गावरान शब्दात सामावलेले होते. बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही.
कलासानिध्य आणि अक्षरसिंधु या सांस्कृतिक संस्थांमध्ये काम करताना मला अशी प्रतिभावंत माणसं भेटली. प्रत्येकामध्ये वेगवेगळा प्रतिभावंत मी बघत होतो. त्यांचं बोलणं, वागणं मी टिपत चाललो होतो. मी त्यांच्यात सर्वांत कमी असल्याने टिपकागदासारखं सगळं टिपत राहण्याचं काम करत होतो. माझ्यातला प्रतिभावंत जागा होईल का ? याची मी वाट पाहत होतो. मला काही ते जमत नव्हते.
आमच्या या टीममध्ये एक कलाकार माझे विशेष लक्ष वेधून घेत होता. मी त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. कुठे पाहिले मी या माणसाला ? जरा स्मरणशक्तीला चालना दिली. हा माणूस मला कणकवलीतच एका दुकानात दिसला होता. मग ते दुकानही आठवले. अरे हो !!! हा माणूस मला दोन दिवसांपूर्वी नारळाच्या दुकानात नारळ विकताना दिसला होता. अरे !!! मग हा माणूस इथे काय करतोय ? म्हणजे हा एवढा प्रतिभावंत नट असूनही नारळाच्या दुकानात नारळ विकतोय तर !!! मला त्या माणसाबद्दल आदर वाढला. त्याची विनोदी शैली मला भावत होती. सगळ्या वाक्यांमध्ये हसण्याच्या जागा या माणसाने शोधून काढल्या होत्या. शाब्दिक कोट्या करत बोलण्याची त्या माणसाची सवय सगळ्यांचीच फिरकी घेत असे. या माणसाशी बोलायचे म्हणजे विचार करूनच बोलायला लागे.
या माणसाने कलाकार म्हणून मालवणी सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या ' वस्त्रहरण ' नाटकातही काम केले होते. गोप्याची भूमिका करताना या माणसाने प्रेक्षकांना त्यावेळी लोटपोट करून सोडले असणार . हा माणूस एक प्रतिभावंत कलाकार असला तरी एक प्रसिद्ध व्यापारी आहे. ' नारळवाले खानोलकर ' म्हणून त्यांची सिंधुदुर्गातच नव्हे तर सगळीकडे ओळख आहे. या माणसाचे नाव विलास खानोलकर. मालवणीत या नावाचा उल्लेख ' इलास ' असा केला जातो. विलास खानोलकर म्हणजे एक चालतेबोलते नाट्यगृह आहे.
आज विलास खानोलकर हे नाव नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असले असते. पण व्यवसाय करता करता त्यांना ही कला जोपासावी लागली. रात्रीचे प्रयोग करून पुन्हा आपल्या पारंपरिक नारळाच्या दुकानात काम करताना ते नेहमी नजरेस पडतात. त्यांना दुकानात कॅल्क्युलेटरची गरज पडत नाही. ते सगळं हिशेब तोंडीच करताना दिसतात. त्यांचे मालवणी भाषेवर नितांत प्रेम आहे. ते शक्यतो मालवणी भाषेतच बोलतात. मालवणी भाषेतील म्हणी वापरत ते आपला संवाद अधिक रुचकर बनवतात. त्यांना मोठया साहित्यिक कार्यक्रमामध्ये बोलावणे येत असते. ते शीघ्र कवी आहेत. ते चारोळी तयार करतात. या चारोळ्यांमध्ये आपला गावाकडील माणूस लपलेला असतो. त्यांचे अनेक मालवणी लेख ' तरुण भारत ' या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. ते माझ्या काकांच्या वयाचे असतील. मी त्यांना कुठेही वाटेत भेटलो , तर मला ते विनोदाने ' काका ' अशी हाक मारतात. मात्र मी त्यांना फोन केला तर , तिकडून आवाज येतो , " बोल प्रवीण , काय म्हंतस ".
या विलास खानोलकरांनी ' इये कोकणचिये नगरी ' अर्थात ' कोकणच्या लोककला ' नावाचा एक अतिशय पारंपरिक , संस्कृतीविषयक आड दशावतार हा कार्यक्रम लिहून त्यात महत्त्वाची भूमिकासुद्धा केली आहे. त्यात त्यांचे मालवणी पात्र अतिशय भाव खाऊन जाते. मी त्यात त्यांच्यासोबत वासुदेव , धनगरीनृत्य , कोळीगीत गायन केले होते. त्यांची आणि अनिल सावंत यांची बतावणी ऐकताना आम्ही नेहमीच पोट धरून हसलो आहोत. अनिल सावंत त्यात कोल्हापुरी माणसाची भूमिका अतिशय छान रंगवायचे. आता ती कोल्हापुरी माणसाची भूमिका कणकवली कॉलेजचे प्राध्यापक हरिभाऊ भिसेसर हेसुद्धा छान वटवतात.
प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा छंदी असतो. विलास खानोलकरांना नाटकाचे , लेखनाचे , काव्यरचना करण्याचे वेडच आहे म्हणा ना !! वगनाट्यात बतावणी करताना सद्यस्थितीवर भाष्य करत बोलण्याची त्यांची पद्धत हास्य निर्माण करते. त्यांचा विनोद हा मार्मिक असतो. पोट धरून हसायला लावणारा असतो. प्रत्येक माणसाने या विलास खानोलकरांसारखे विलासी व्हायला हवे. अश्या प्रकारचा विलास प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी यायलाच हवा. माझ्या जीवनात हा विलास आला आणि माझे जीवन चांगल्या अर्थाने ' विलासी ' करून टाकले. म्हणूनच मी गमतीने म्हणतो , " इलास , कधी इलास ? " .
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )