सायलेन्स सर
गाडी चालवताना सावकाश चालवण्यासाठी खूपदा प्रयत्न केला जातो. पण गाडीवर बसल्यानंतर सोयीस्करपणे ही गोष्ट विसरली जाते. मग ती टू व्हीलर असो , नाहीतर आणखी जास्त व्हीलर. गाडी चालवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. एकदा गाडीवर बसल्यानंतर ती कशी चालवायची हे मागून कोणी सांगत राहिले की रागच येतो. पण सांगणारे आपल्या भल्यासाठीच सांगत असतात ना ? आपल्याला ऐकायला काय हरकत आहे. आपण ऐकत नाही, मनाला वाटेल तशी गाडी पळव पळव पळवतो. पडल्यानंतर लक्षात येते की सांगणाऱ्याचे ऐकले असते तर ही वेळ आलीच नसती.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत जायला बाहेर पडलो. जाताना छोट्या उर्मीने मला प्रेमाने सांगितले, “ 'पप्पा , सावकाश जावा आणि सावकाश येवा. ” मी तिला जवळ घेऊन तिचा गोड गोड पापा घेतला. किती काळजी घेतात आपली घरातली माणसं ! अगदी लहानांकडूनही आपली अशी काळजी घेतली जाते. आपल्यावर नियंत्रण ठेवण्यात घरातल्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या अश्या सांगण्यामुळे आपणही गंभीर होतो. कुठेही जाता येताना जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न तरी करतो. शाळेतून यायला उशीर झाला तरी घरातली माणसं वाटेकडे डोळे लावून असतात. घरातून बाहेर पडलेला आपला माणूस घरी सुखरूप परत यावा यासाठी त्यांची ही तळमळ असते. त्यांनी फोन केला आणि आपण तो वेळीच उचलला नाही तरी त्यांना अधिकच काळजी वाटते. नियोजित ठिकाणी पोहोचल्यानंतर एखादा फोन करावा एवढीच त्यांची रास्त मागणी असते आणि आपण ती बऱ्याचदा पूर्ण करत नाही ही आपली अक्षम्य चूकच असते. आपण कामात असतो त्यामुळे फोन करायचा राहून जातो. घरच्यांसाठी एक फोन करणे किंवा एक संदेश पाठवणे हे अशक्य तर बिलकुल नाही. माझ्याकडूनही कधी असा फोन करायचा राहून जातो आणि त्यांचाच फोन येतो.
आज शाळा सुटल्यानंतर घरी जात होतो. गाडीचे नुकतेच काम करून घेतल्याने स्पीड कमी ठेवण्याबद्दल मला सांगितले गेले आहे. त्यामुळे मुद्दाम 40 चा स्पीड ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इतका कमी स्पीड ठेवून गाडी चालवताना गाडी चालतच नाही असे वाटत राहते. मग हळू हळू कधी स्पीड वाढतो , समजतसुद्धा नाही. त्यात स्पीडो मीटर बंद असल्यामुळे स्पीडही समजत नाही. असो. आज स्पीड 40 चाच होता. तळेरे पर्यंत अगदी व्यवस्थित आलो. रस्त्याचे काम सुरूच आहे. फ्लाय ओव्हर वरून जाता येईल असे वाटले. वाटले काय, वाटण्याआधी गाडी आपोआप त्यादिशेने वळलीही. मग काय, पुढे पुढे जात राहिलो. दोन तीन डंपर माती टाकण्याचे काम करत होते. वाटेत एका ठिकाणी विचारूनच पुढे गेलो. त्यांनी पुढे जाता येईल असे सांगितले. त्यांचा हिरवा कंदील मिळाला. आता जाणे अवघड नसेल असे वाटून पुढे जात राहिलो. लाल माती रस्त्यावर मस्त अंथरली होती. तिच्या पलीकडे 100 मीटरवर गेलो की झाले. मूळ रस्त्यावर पोहचणे अगदी जवळ आलेले होते. 40 च्या स्पीडने गाडी पुढे दामटली. रस्त्यात पाणी टाकून त्यांचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मलाही युद्धपातळीवर घरी जाण्याचे वेध लागले होते. नेहमीप्रमाणे काहीतरी मनात विचारचक्रे सुरूच होती. गाडीचीही चक्रे तशीच सुरू होती. गाडीने अचानक वेग कमी केला होता. गाडीचे मागचे चाक निसटले. चिखलामुळे गाडी स्लिप झाली होती. डाव्या दिशेला गाडी कमालीची कलली. मी ती कंट्रोल करणे शक्य नव्हते. मी कोसळलो होतो. कोसळल्यानंतर भानावर आलो. अरे, मी पडलो कसा काय ? काहीही समजण्याच्या आत कोसळलो होतो. गाडी चिखलात रुतली होती. चप्पलही चिखलाने पुरते बरबटले. टाचा जाड झाल्या होत्या. मी पडल्याचे पाहून एक जेसीबीवाला धावतच माझ्याजवळ आला. माझी आपुलकीने चौकशी केली. पाणी आणून दिले. माझ्या उजव्या पायाला गाडीचा ‘ सायलेन्सर ’ लागला होता. गाडीने 10 किमी अंतर पार केले होते. उन्हाळा असल्यानेही सायलेन्सर बऱ्यापैकी तापलेला होता. माझ्या उजव्या पायाच्या पोटरीचा पुसटसा स्पर्श सायलेन्सरला झाला होता. पायाला चांगलाच चटका बसला. ( चटका तर बसला , त्याला वाईटच म्हणायला हवे होते, पण आता नाईलाजास्तव त्याला चांगला चटका असे विशेषण देणे भाग पडतंय ) पॅंटीच्या कापडाला काहीही झाले नाही. त्याच्या आत माझ्या पायाला बसलेला चटका तेव्हा जाणवला नाही. त्यावर मी माझ्याकडचे प्यायचे पाणी ओतले. जेसीबीवाल्याने दिलेल्या बाटलीभर पाण्याने मी माझ्या गाडीला थोडेसे धुवून घेतले आणि जाड चपलांनी , जड अंतःकरणाने गाडीला किक मारली. गाडी बिचारी तशीच त्याच वेगाने पूर्वीसारखीच न कंटाळता पळू लागली. ती मला म्हणत होती , “ सायलेन्स सर …. सायलेन्स सर …. नाहीतर पुन्हा लागेल सायलेन्सर.
©️ प्रवीण अशितोष कुबल( 9881471684 )
.jpeg)