कानात फुंकर
कुबल कुटुंबाचे शिरवंड्यामध्ये देवाच्या होमाचे धार्मिक कार्य संपन्न होणार होते. पूर्वीचे मूळगाव आणि मूळघर असल्यामुळे मुंबईपासून बरीच मंडळी होमासाठी आली होती. त्या होमाला ' पाठंतार ' असे म्हणत असत. पाठांतर किंवा पाठंतार ( मालवणीतील शब्द असू शकतो ) मूळघरात संपन्न होण्यासाठी महिने दोन महिने अगोदर बैठका घेतल्या गेल्या होत्या. जपजाप , गार्हाणी, भटजींचे पठण , नारळांची पोती, कडकबुंदी लाडू , फुले , हार , केळीची पाने , गोड जेवण असं बरंच काही असावं.
सगळंच काही आठवणं कठीण जातंय. त्यावेळी मी लहान असल्यामुळे काही घटना पुसटश्या आठवताहेत. लहानपणी मी बघितलेला तो सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. लांबलांबून आलेले नातेवाईक व भाऊबंदकी असणारे सर्वजण त्यानंतर कधी एकत्र आले नाहीत. आपला देव आपल्याकडे सतत पाहत राहावा ही ओढ सगळ्यांना जवळ घेऊन आली होती. कदाचित घरच्या देवाला घाबरुनही सगळे एकत्र एका छताखाली आले असावेत. अगदी सगळे हेवेदावे विसरुन.
देवासाठी किंवा देवाच्या भयाने का होईना माणसांनी कधीतरी एकत्र आलेच पाहिजे. पण आता लोक इतके मोठे झाले आहेत कि ते देवालाही आपल्यापेक्षा लहान समजू लागले आहेत. देव तर आहेच, पण तो जाणला पाहिजे. पूर्वजांनी नातेवाईकांना एकत्र येण्यासाठी ' गेटटुगेदर फॉर गॉड ' म्हणजेच पाटंतार हा धार्मिक उपक्रम सुरु केला असावा असे मला वाटते. त्यानिमित्ताने आपल्या भावबंदांच्या ओळखीपाळखी होतात. जुने नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते.
पूर्वी पाळण्यात बघितलेल्या बंटीचे लग्न होऊन त्यालाही एखादा दुसरा बंटी झाल्याचे पहावयास मिळायचे. इतक्या वर्षांनी बंटीला पाहिले म्हणून बंटीचे त्यावेळचे मोठेथोरले लोक त्याचे बालपण सांगू लागत. मग ते असेही म्हणत, " तुझा मुलगा हा दुसरा बंटी अगदी तू लहान असताना रडायचास तसाच रडतोय बघ." तसं बघितलं तर सगळी लहान मुले एकसारखीच रडतात. त्यात फारशी विविधता असेल असे मला वाटत नाही. त्यांचे ऐकून हसूच येई.
जख्खड म्हातारी माणसेही त्या कार्यक्रमात भेटत. मान हलणारी, पोक काढून चालणारी, सतत बडबड करणारी , फुकटचा सल्ला देणारी अशी बरीच वयस्कर माणसं भेटत , तशी लहानांवर जीवापाड प्रेम करणारी, पाठीवरुन मोरपिसासारखा हात फिरवणारी, बोबडं बोलणारी मोठ्या वयाची लहानांसाठी सान होणारी माणसंही भेटत. अशा प्रेमळ माणसांची माया लहानांना समजतही नसेल. पण ज्यांना नातवंडं असतात त्यांना सगळ्या छोट्यांमध्ये आपलीच नातवंडं दिसत असावीत. ज्यांना ती नसतील ते या नातवंडांनाच आपली नातवंड समजत असावीत.
जगातील सगळे आजीआजोबा आपल्या नातवंडांसाठी असंच प्रेम करत असतील का ? पण त्यांची ही नातवंडं आजीआजोबांचं हे निर्व्याज प्रेम समजत असतील तर त्यांना महानच म्हणावे लागेल. पण सर्रास तसे घडताना दिसत नाही. त्यावेळी वयाने म्हातारे पण मनाने तरुण असलेले हळवलचे कुबलआजोबासुद्धा आम्हांला जिव्हाळ्याचे वाटत. ते आमची गंमत करत. ते आमचे लाड करत. आमच्याशी बोलायला त्यांना खूप आवडायचे. त्या दिवशी ते सुद्धा आले होते. वयस्कर माणसांपेक्षा ते आमच्यातच जास्त रमत.
आम्ही भावंडे ह्या कार्यक्रमाला या घरातून त्या घरात फिरतच होतो. मज्जा मज्जा करत होतो. सगळ्या लहानथोरांशी ओळख वाढवत उदंड हुंदडत होतो. शाळेला सुट्टी मारून मजा करण्यातला आनंद अनुभवत होतो. धार्मिक कार्यक्रमातला ओ की ठो आम्हाला समजत नव्हता. पण सगळ्या मोठ्यांकडून विविध प्रकारचा गोड खाऊ मिळत होता. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. सगळे लहानथोर एकत्र येऊन विचारमंथन करु लागले होते. रात्री महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळाला होता.
पंगतीला जेवताना श्लोक म्हणत जेवणे होत होती. प्रत्येकजण आपल्या मुलांना श्लोक म्हणण्यासाठी प्रवृत्त करत होते. आम्ही कधी श्लोकच म्हटले नव्हते. त्यामुळे आम्ही त्या खेड्यातल्या लहान मुलांच्या मुखातून बाहेर पडणारी सरस्वती पाहून थक्क होऊन गेलो होतो. एवढे अवघड संस्कृत श्लोक ती दोन तीन मुले न घाबरता म्हणताना दिसत होती. आम्ही शहरातल्या शाळेत शिकत होतो. आम्हाला फक्त गुरुर्र ब्रम्हा ... हा एकच श्लोक येत होता.
उत्तररात्रीत भजने आणि दशावतारी नाटक वगैरे कार्यक्रम झाले. आम्ही न झोपता सकाळपर्यंत ते कार्यक्रम बघता बघता कुठे झोपलो ते आठवतंही नाही. सकाळी बाबांनी हलवून उठवले तेव्हा जाग आली. कणकवलीला जाणारी गाडी सकाळी नऊ वाजता होती. आम्ही तोंड धुवून चहा पिऊन स्टाॕपवर हजर झालो. माझ्या डोळ्यावरची झोप गेलीच नव्हती. गाडी अजून आली नव्हती. गाडीची वाट पाहणाऱ्या नातेवाईकांची बडबड सुरु होती.
माझा छोटा भाऊ रात्री लवकरच झोपला होता. त्यामुळे तो सकाळी ताजातवाना असल्यामुळे ' याची कळ काढ, त्याला चिमटा काढ ' असे त्याचे कारनामे सुरु होते. मी आपला डोळे बंद करुन गाडी यायची वाट बघत होतो. गाडी काही येत नव्हती. तेवढयात माझ्या कानात कोणीतरी जोरात फुंकर मारली. मी आधीच कंटाळलो होतो. झोप अनावर झाली होती. माझ्या लहान भावाचीच ही खोडी असणार याची मला पक्की खात्री होती. माझा रागही अनावर झाला. रागाच्या भरात मी डोळे न उघडताच भावाच्या कानशिलात लगावून दिली. एवढे मोठ्याने मारले होते कि माझा भाऊ मोठ्याने भोकाड पसरणार होता.
पण अजून तो रडत कसा नाही म्हणून डोळे उघडून बघितले तर , बिचारे कुबलआजोबा माझ्यासमोर हसतहसत उभे. मी भावाच्या नाही तर कुबलआजोबांच्या कानाखाली मारल्याचे माझ्या लक्षात आले. तरी मला शंका आलीच होती, ज्या गालावर मी मारले होते तो गाल एवढा लिबलिबीत कसा काय ? तो गाल भावाचा नसून कुबलआजोबांचा होता हे समजल्यानंतर माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सगळे माझ्याकडे रागाने बघू लागले होते. माझी झोप उडाली होती. आता माझे बाबा मला शिल्लक ठेवणार नाहीत या भितीने मी रडू लागलो. पण त्या कुबलआजोबांनीच मला जवळ घेतले. ते म्हणाले , " अरे बाबा, मीच तुझ्या कानात फुंकर मारली होती, मी तुझी गंमत केली, म्हणून मला शिक्षा मिळाली. तू काय स्वतःहून माझ्या कानशिलात मारले नाहीस. तुझ्याकडून अनावधानाने तसे घडले. मी लहान मुलासारखा वागलो, तू बरोबर वागलास. मला अजिबात राग आलेला नाही. तू रडू नकोस. " असे त्यांनी म्हटले तेव्हा मी त्यांच्या कुशीत शिरलो.
मला ती म्हण आठवू लागली. डोळ्यात केर आणि कानात फुंकर ....... आज वेगळेच घडले होते. डोळ्यात झोप, कानात फुंकर आणि कानशिलात चापटी .... पुन्हा मात्र माझ्या भावाने कधीच माझ्या कानात फुंकर मारली नाही. कारण हा घडलेला प्रसंग त्याने प्रत्यक्ष पाहिला होता. तो म्हणाला होता , " मी फुंकर मारली असती तर माझ्या गालाचे काय झाले असते ? " मी आता कधीही हा प्रसंग आठवतो तेव्हा तेव्हा ते कुबलआजोबा माझ्या मनःचक्षुंसमोरुन सरकन निघून जातात. ते आज असते तर .. ?.... ही फक्त एक कल्पनाच असू शकते.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
