काय असते रक्षाबंधन ?
आम्ही भावंडे रक्षाबंधन येण्याची नेहमी वाट बघत बसतो. तेवढेच बहिणी भावांच्या आठवणी जागृत होतात. पण एक वर्षाने येणारे हे रक्षाबंधन खूपच उशिराने आल्यासारखे वाटत राहते. भाऊ बहिणीच्या येण्याची आतुर होऊन वाट बघत असतो. बहीण कधी एकदा राखी बांधून भावाला भेटून जाण्यासाठी व्याकुळ झालेली असते. दोन्हीकडून प्रेमाने व्याकुळ होणे सुरूच राहते. कित्येक वर्षांपूर्वीचे रक्षाबंधन आठवते, त्यावेळी मोठ्या थोरल्या राख्या असत. स्पंजच्या राख्या, लोकरीच्या राख्या , मण्यांच्या राख्या आणि दरवेळी येणारे ट्रेंड्स अशा राख्या बघत राहायला आवडतात. बहिणींना ही घेऊ कि ती घेऊ असे होऊन जात असेल. भारीवाली राखी माझ्या लाडक्या भाऊरायासाठी म्हणत बहीण आपल्याकडे साठलेले सर्व पैसे खर्च करून राख्या घेत राहतात. खूप बहिणी असलेले भाऊ आपल्या हातात किती राख्या बांधल्या आहेत त्या मोजत राहतात. संध्याकाळपर्यंत संपूर्ण हात भरून जातो. लहानपणी छोट्या हातात मोठ्या राख्या बांधल्या जात, आता मात्र उलटे झाले आहे, मोठ्या हातांमध्ये छोट्या राख्या बांधण्याची फॅशन येऊ लागली आहे.
काहीही झाले तरी दिवसभर राख्यांनी बांधलेले दोन्ही हात फिरवत आम्ही दोघे भाऊ सर्वांना दाखवत सुटत असू. कोणी कोणती राखी बांधली याचे सर्वांनाच अप्रूप असे. जेवढी मोठी राखी तेवढी अधिक माया असे आम्हाला त्यावेळी वाटत असे. आता मात्र ती माया कमी झाली की काय ? कारण आता खूपच छोट्या राख्या बाजारात येत आहेत, आणि अतिशय महागड्या सुद्धा आहेत. राखी कसलीही असो, भगिनीप्रेम मात्र त्यात पुरेपूर भरलेले दिसे. भावाकडून कोणतीही अपेक्षा कधीही न बाळगणाऱ्या आमच्या बहिणी अजूनही तश्याच आहेत. त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. राख्या छोट्या झाल्या , पण माया अधिक मोठी झाल्याचे आजही लक्षात येते. खूप लांब गेलेल्या बहिणी फक्त अंतराने लांब गेल्या , पण अंतःकरणाने खूप जवळ येत आहेत. लहानपणीच्या गोड आठवणी जपत अधिक प्रेमभराने डोळ्यात आनंदाचे अश्रू आणत आहेत. बंधुप्रेमाने भारावून जात , फोनवरून बोलत आहेत. व्हिडिओ कॉल करून जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत.
ताईने दिलेली प्रेमाची शिकवण , आकाने दिलेली प्रेमाची चापटी , पपीने लटक्या रागाने केलेला तोंडाचा
ओ आजच्या सेल्फीपेक्षा खूपच भारी आहे. आईचे रक्षाबंधन , मामांची ओवाळणी यामुळे रक्षाबंधन आमच्यासाठी आनंदोत्सव असे. आम्हाला त्या दिवशी खूप सारा खाऊ मिळत असे. मामाचे आमच्याकडे येणे आम्हाला नेहमीच सुखावणारी गोष्ट असे. त्यांची गोड स्मित हास्याची लकेर आम्हाला आमच्यात स्फुल्लिंग पेरून जात असे. आज त्यांनीही आठवण येते आणि जीव कासावीस होतो. त्यांच्यासोबतच दिवस अविस्मरणीयच होते. आई गेल्यांनतर दर राखीपौर्णिमेला ते आईच्या प्रतिमेला हार घालण्यास येत ते बघताना आम्हालाही त्यांचे बहिणीवर असलेले निर्व्याज प्रेम दिसत असे. आम्ही त्यांच्याकडूनच बहिणीवर कसे प्रेम करावे ते शिकलो. आई आणि भाईमामांच्या अश्या आठवणी आहते कि ती भावंडे कधी वाद खेळताना दिसली नाहीत. आज आम्ही मात्र बारीक सारीक कारणांचा बाऊ करतो. वाईट वाटून घेतो. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवतो. दुसऱ्यांना दोष देत बसतो. आपलेच बरोबर , दुसऱ्याचे चुकले म्हणून कुढत बसतो. हे कसले प्रेम ? ही असेल निव्वळ देवघेव आणि लोकांना दाखवण्यासाठी केलेली राखीपौणिमा.
आजसुद्धा राख्या पोष्टाने येतात, लवकर येतात, कधी उशिराने येतात. त्यात अगदी तश्याच भावना पाठवलेल्या असतात. त्या फक्त समजणे भावासाठी मोठे काम असते. आम्ही दोघेही भाऊ आमच्या सर्व सख्ख्या , चुलत बहिणींना, मामेबहिणींना कधीही अंतर दिलेले नाही आणि पुढे देणार नाही. त्यांनी राख्या पाठवो अगर न पाठवो ...त्या सर्व बहिणी आमच्या दोघांसाठी सर्वश्रेष्ठच आहेत. त्यांनी आम्हांला कधीही हाक मारावी, आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी धावून जाऊ. जगातील माझ्या सर्व बहिणींसाठी जगात जेवढे पाणी आहे तितक्या शुभेच्छा.



















































