Tuesday, April 23, 2024

परीक्षा संपल्या , आत्ता मज्जा

     नुकत्याच परीक्षा संपल्या आहेत आणि सुट्ट्या सुरु होण्याचा हंगाम सुरु झाला आहे. मार्च , एप्रिल हे दोन महिने परीक्षांचे महिने म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दोन महिन्यांची संपण्याची वाट सर्वच परीक्षार्थी करत असावेत. 

    आम्ही त्यावेळी परीक्षांच्या दिवसांत खूप अभ्यास करत असू. नेहमी पुस्तकांच्या सानिध्यात राहत असू. पुस्तके म्हणजे पाठ्यपुस्तके. ही पाठ्यपुस्तकेच आमचे मित्र झालेले होते. त्यांचा सहवास सतत लाभण्याचे ते दिवस आठवले की मस्त वाटते. 

    आता मुले अभ्यासाचा कंटाळा करताना दिसतात. पुस्तकांचा सहवास तर त्यांना नकोच असतो. काही अपवाद सोडले तर अनेकांना परीक्षेपुरता अभ्यास करताना पाहून खूपच वाईट वाटते. आजची मुले फक्त परीक्षार्थी झाली आहेत की काय ? परीक्षा आल्या कि अभ्यास करायचा एवढेच त्यांचे म्हणणे असते. वाचन करायला सांगितले तर त्यांना झोपा येतात. अभ्यासाची पुस्तके वाचणे तर त्यांच्या जीवावरच येते. 

    आज प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यावर अनेक प्रकारचे लिखाण उपलब्ध असते. मुलांना हे सर्व प्रकारचे वाचन करण्याची अनमोल संधी असते. 

Thursday, February 29, 2024

🛑 दक्ष राहणारी दक्षता

 🛑 दक्ष राहणारी दक्षता

          माणसं जन्माला येतात, मरुनही जातात. कधीतरी मरुन जाणार हे प्रत्येकाला माहित असतं. माणसाचं मरण कधी येणार हे माहित असतं तर!!! तर माणसाची जगण्याची इच्छाच मरुन गेली असती. मरणार कधी हे माहित नसतं, म्हणून आपण सुखाने जगत राहात असतो.

          काही लोकांचं वय झालेलं असतं. त्यांना त्यांच्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो. कंटाळून जगणं हेच त्यांच्या जीवनाचं गणित झालेलं असतं. ज्यांना जगायचं असतं, त्यांना मात्र नियती लवकर का घेऊन जाते ते समजत नाही. जगायची तीव्र इच्छा असते. जीवनाकडे आशेने पाहत असताना अचानक एखादी व्याधी जडते आणि जगण्याच्या उमेदीचेच खच्चीकरण होते.

          दक्षता एक गुणी मुलगी. खेड्यात राहणारी. तिचे कुटुंब अतिशय प्रेमळ. तिचे आई, वडील, बहिण, भाऊ, आजी सगळे दक्षताला जीव की प्राण. तिनेही या सर्वांवर अतिशय जीव लावला. तिला गप्पा मारायला खूप आवडत असे. ती गप्पांमध्ये रंगून जाई. तिचा हसरा चेहरा त्यावेळी अधिक खुलून दिसे.

          तिचं बोलणं, वागणं, मिसळणं, मैत्री करणं लक्षात राहण्यासारखंच होतं. तिची आणि माझी भेट तिच्या वडिलांमुळे झाली. वडील समाजाची सेवा करण्यात आनंद मानणारे. समाजाची सेवा करताना त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले संस्कार दिले हे विसरून चालणार नाही. आपल्या मुलांना मार्गदर्शन करताना आपल्या समाजातील मुलांनाही मार्गदर्शन करताना ते नेहमीच तहानभूक हरपून जात असतात.

          मुलगी शिकली की पुढे काय करावे हा प्रत्येक बापाला प्रश्न पडतो. दक्षताच्या बाबांनी तिला ब्युटीपार्लरचे शिक्षण देण्याचे ठरवले. एका प्रसिद्ध ब्युटीपार्लरमध्ये ती ' कमवा आणि शिका ' पद्धतीने शिकू लागली. एकदा बघितले की दक्षताला चांगले लक्षात येई. तिने सर्व प्रकारच्या थेरपी लवकरच आत्मसात केल्या. बोलता बोलता तिचे हातसुद्धा सफाईने चालत असत. तिचं बोलणं गोड होतं. त्यामुळे तिच्या हातून ब्युटी थेरपी करायला आलेली महिला कस्टमर खुश होऊन जाई. दिसत असे शिकण्यात सुंदर रितीने निघून जाताना समाधान आणि सुखाचा अनुभव येत होता.

          अचानक दक्षताला त्रास सुरु झाला. तिला कॅन्सर असल्याचे समजले तेव्हा तर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. ती स्वतः मात्र खंबीर होती. तिने धीटपणे दुर्धर व्याधीला पळवून लावण्याचे ठरवले होते. तिच्या वागण्या - बोलण्यात काहीच फरक जाणवत नव्हता. ती जशी पूर्वी होती, तशीच हसरी मुद्रा घेऊन समोर येई. तिचे दुःख तिने स्वतःच सूर्यासारखे गिळून टाकले होते. कर्करोगाला पळवून लावण्याचं धारिष्ठ्य करणारी दक्षता अजिबात हार मानायला तयारच नव्हती.

          ती आली की हसतमुखाने यायची. तिची लहान मुलांशी लगेच मैत्री व्हायची. मग तिच्या अमर्याद गप्पा सुरु होत. ती मनुष्यवेल्हाळ होती. तिला माणसांमध्ये राहायला खूप आवडे. तिने एकदा मैत्री केली की कायमची. तिच्या अनेक मैत्रिणी होत्या, तसे मित्रही. तिची मैत्री निरागस होती.

          बऱ्याचदा तिला केमोथेरपीसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागे. तिथल्या स्टाफबरोबर तिने मैत्री केली होती. केमोमुळे तिचे केस जाऊ लागले होते. ब्युटी थेरपी करणारी मुलगी केसांच्या गळण्याने डगमगली नाही. तिने निकराने प्रतिकार केला. ती आली की तिचा निस्तेज झालेला चेहरा पाहून काळीज आतून चर्र होई. ती आपल्या त्या जीवनावर अजिबात नाखुश नव्हती.

          त्यादिवशी तिला ताप आला होता. ताप आला आणि तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. डॉक्टर उपचार करण्यासाठी पुन्हा लांबच्या हॉस्पिटलमध्ये नेणे भाग होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तिला होणारा त्रास असह्य मानसिक वेदना देत होता. हॉस्पिटलाईज करुन सुद्धा तिच्या तब्येतीत काहीच चांगला फरक पडत नव्हता. तिचे शरीर निश्चल पडू लागण्याची लक्षणे डॉक्टरांनाही दिसू लागली होती. तिचा हसरा चेहरा हळूहळू शांत शांत होत जाऊन कायमचा शांत झाला होता. तिचे हसणे आता पुन्हा कधीही पाहता येणार नव्हते. कायमची दक्ष असणारी दक्षता खूप खूप दूर निघून गेली होती.

©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली

Saturday, November 11, 2023

🛑आली दिवाळी

 🛑 दिवाळ सण आला

          दरवर्षी दिवाळी सण येतो. प्रत्येक वर्षाला नवीन आकर्षण असते. तो येतो तेव्हा उत्साह घेऊनच येतो. माणसं तीच असतात, त्यांच्यात उत्साह मात्र नवीन येत असतो.

          शाळांना सुट्ट्या लागतात. दिवाळीची सुट्टी हिवाळी सुट्टी म्हणून देण्यात येते. यंदा हिवाळी सुट्टीत हिवाळा जाणवताना दिसत नाहीय. नोव्हेंबर आला तरी गारवा, थंडी कुठे अनुभवायला मिळताना कठीणच झालेली दिसते आहे. कपाटातील स्वेटरे तशीच पडून आहेत.

          उद्या नरक चतुर्दशी. अनेक ठिकाणी नरकासुराचे मोठाले देखावे मांडले जातात. स्पर्धा भरवल्या जातात. अगडबंब राक्षस जाळले जातात. भावना महत्वाची असल्याने सगळेच त्यात सहभाग घेताना दिसतात.

          सकाळी लवकरच फटाक्यांच्या अतिशबाजीने जाग येते. शहरात रात्री बारा वाजल्यानंतर फटाके सुरु होतात, ते सकाळी दिसू लागले तरी वाजतच असतात. कानठळ्या वाजवणारे बॉम्ब बोंब मारत असतात. रोशनाईने शहरे झगमगून उठतात. लोकांच्या रोमारोमात चैतन्य संचारु लागते. तेही त्या आवाजाचा एक भाग बनून जातात.

          अभ्यंग स्नान करताना सुगंधी उटण्याचे सार्थक होते. अंग सुगंधाने दरवळू लागते. गरमागरम पाण्याचा शिडकावा अंगावर घेताना शहारे येतात. नवीन फोडलेला सुगंधी साबण अंगावर चोळताना पूर्वीची दिवाळी आठवून शहाऱ्यांची संख्या वाढत जाते.

          बाहेर पेटणाऱ्या पणत्या, आकाशकंदील हसत हसत नव्या दिपवर्षाचे स्वागत करताना अधिक सुंदर दिसू लागतात. आईने केलेल्या फराळाचा वास तोंडात पाणी आणू पाहत असतो. नवीन खरेदी केलेले कपडे आज घालताना खूप मस्त वाटत असते. कांदेपोहे, चकल्या, करंज्या आणि लाडवांची ताटे समोर येऊ लागतात. फराळ खाण्याचा अतिआग्रह केला जातो. हे खाऊ कि ते खाऊ असे होऊन जाते. गोड पदार्थांपेक्षा तिखट व कुरकुरीत पदार्थांचा फडशा पाडला जातो.

          जवळच्या मंदिरात काकड आरती सुरु होते. अजित कडकडे आणि सुरेश वाडकरांची गाणी कानांना तृप्त करु लागतात. परिवारासह मंदिरात जाताना वाटेतले विविध प्रकारचे आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या पाहताना मनाला अपार आनंद होऊ लागतो.

          तुळशी वृंदावनासमोर कडू कारेटांची फोडलेली रांगोळी दिसू लागते.



Friday, November 10, 2023

तुम्ही लिहित आहात का ?

 🔴 तुम्ही लिहित आहात का ? 

          हल्ली बरेच दिवस काहीतरी लिहावं असं वाटतंय !!! खरंच , लिहावं आणि मोकळं व्हावं असं वाटत असेल प्रत्येकालाच. पण वेळ कुठे मिळतोय लिहायला ? लिहायला सुचतंय खूप. लिहायला बसायला वेळ कसा तो मिळत नाही. 

          लिहायला बसलो कि काहीतरी काम समोर येऊन उभं राहतं. मग तेच काम महत्त्वाचं वाटतं. लिहिणारा मग ते काम करण्यात दंग होतो. लिहिणं राहूनच जातं. माझं हल्ली अगदी असंच होतंय. 

          मघाशीच माझा एक लेखक मित्र भेटला. त्याने आपली गाडी काहीशी स्लो केली. त्यालाही गडबड होतीच. तरीही त्याने मला हाच प्रश्न विचारला , " अरे प्रवीण , तू लिहितो आहेस ना ? " मी त्याला माझ्या कामांची यादी पुढे केली. त्यालाही ते पटलं. तो म्हणाला , " तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे मित्रा , पण तू तुझं लिहिणं सोडू नकोस " त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. मी त्याचं ते म्हणणं गंभीरपणे घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. 

          माणसाने आपल्या जगण्यात आवडीच्या गोष्टी केल्या नाहीत , तर त्याचं जगणंच निरस होऊन जातं. मला वाचनाची आवड आहेच , पण त्याहीपेक्षा लेखनाची अधिक आवड आहे. मी एकदा लिहायला बसलो कि थांबता थांबत नाही. माझा लेख पूर्ण होईपर्यंत व्यत्यय आला नाही तर मी माझं भाग्यच समजतो. पण व्यत्यय आला नाही असं होतच नाही मुळी. 

          मी एक शिक्षक आहे. शिक्षकाने जसं सतत वाचत राहायला हवं , तसंच त्यानं प्रसंगानुरुप लिहीत सुद्धा राहायला हवं. लिहायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढायला हवा. तुमच्या मनात आलेले विचार व्यक्त करायला हवेत. एकदा का तुमची लिहिण्याची सवय गेली की पुन्हा तुम्हाला लिहिताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. 

          लिहिता म्हणजे तुम्ही नक्की काय करता ? तर तुमच्या मनातील विचारांना वाट करुन देत असता. एकदा विचार सत्यात प्रकटले की तुम्ही तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळालेली असते , विचारांचा निचरा झालेला असतो. अन्यथा विचारांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

          तुमचे अनमोल विचार वाचण्यासाठी अनेक वाचक उत्सुक असू शकतात. त्या वाचकांची तहान भागवणे हेही तुमच्या लेखनाचे ध्येय असू शकते. तुम्ही स्वतः ताणतणावमुक्त होऊन जाता ही गोष्ट वेगळी. सतत सर्जनशील संकल्पना निर्माण करण्याची तुमची क्षमता वापरली कधी जाणार ? 

          तुमचे मित्र तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगत असतील तर नक्की ऐका. तुम्ही तुम्हाला एका चांगल्या वाटेने नेत आहात हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे. नाही का ? 



Wednesday, September 6, 2023

🛑 सर्वांची माई गेली

🛑 सर्वांची माई गेली

          प्रत्येकाला एक आई असते. आपल्या आईवर आपण जिवापाड प्रेम करतो. ती आपल्यावर निरतिशय प्रेम करत असते.  आईला अनेक मुले असली तरी सर्वांवर तिचे तितकेच प्रेम असते. 

          आमची बिडवाडीची आत्या सर्वांची आईच होती. तिला सर्वजण माई या नावाने हाक मारत. हिंदीतील माँ आणि मराठीतील आई या दोन शब्दांचा संगम म्हणजे ' माई ' हे संबोधन तयार झाले असावे. माई या शब्दातच अपार माया भरलेली आहे. माई होतीच तशी. अतिशय मायाळू. तिची माया तिच्या शब्दांतून प्रकट होत असे. तिच्या डोळ्यांत माया दिसे. ती सर्वांना दिसत नसे. ती निर्मळ माया पाहणारा विरळाच. 

          माझ्या बाबांपेक्षा एक ते दोन वर्षांनी मोठी असलेली माझी आत्या सर्वांची खऱ्या अर्थाने माईच होती. तिच्या मालवणी गावठी भाषेतील माया तिच्या शिवराळ शब्दांतून प्रकट होई. ती खूपच परखड होती. तिचा आवाजही मोठा होता. त्या आवाजात अजूनही जरब होती. ती कधीही कोणालाही घाबरलेली नव्हती. 

          आम्हां भाचरांवर तिचं खूपच प्रेम. आम्ही तिच्याकडे गेलो कि ती मायेने आमचं सगळं करीत असे. जेवू खाऊ घाली. तिच्या हाताची चवच भारी. काहीही खाल्ल्याशिवाय तिने आम्हांला कधीच पाठवले नाही. ती आमच्या पाठीवरुन मायेने हात फिरवी. तिच्या मायेची ऊब आता पारखी झाली आहे. तिच्या घरी आता जी उणीव निर्माण झाली आहे , ती कधीही भरुन न येणारी पोकळीच आहे. आमचे चुकले की ती आमच्यावर रागवायची. तिचे रागावणे बरोबरच असे. तिला सर्वांनी व्यवस्थित असावे , सुखी , समाधानी असावे असे वाटे. तिने कधीही कोणाकडूनही कसलीच अपेक्षा केली नव्हती. आमच्याकडून तर मुळीच नाही. तिच्याकडून जाताना ती आमच्या हातात काहीतरी दिल्याशिवाय पुढे पाठवत नसे. ती निस्वार्थी आणि धार्मिक होती. 

          ती आपल्या नातवंडांना बोलबोल बोलायची. पण त्यांनी वेळीच खावे , अभ्यास करावा यासाठी तिचा तीळ तीळ तुटताना मी बघितले आहे. 

          तिचे पती म्हणजेच आमचे ' जिजी ' एक सुप्रसिद्ध वैद्य होते. त्यांच्यावर तिचे खूप प्रेम होते. ते गेले आणि ती दुःखी झाली होती. तिचे रिक्त कपाळ पाहून आम्हांलाही वाईट वाटे. नवरा गेल्याचे दुःख फक्त त्या बाईलाच असते. तिचे ते दुःख कोणीही काहीही केले तरी कमी होणारे नसते. 

          दोन मुलगे , दोन सुना , नातवंडे , एक मुलगी , जावई आणि आम्ही जवळचे नातेवाईक तिच्या जवळ असलो की तिच्या बोलण्याला बहर येई. ती बोलत राही. तोंडात दात नसले तरी न चावता येणारे पान चघळत राही. 

          ती आजारी पडली. तिचा आजार वाढत गेला. तो कमी होण्याची चिन्हे दिसेनात. मुलांनी बरेच प्रयत्न केले. पण ती पुरती थकून गेली होती. आता तिला थांबावेसे वाटत नव्हते. ती कोणालाही ओळखेना. ती फक्त डोळे उघडून बघायची. मानेने होकार किंवा नकार द्यायची. ती स्वतःच्या आजाराला कंटाळली होती. अखेर तिने अखेरचा श्वास घेतला. एक गावप्रसिद्ध माई सर्वांनाच कायमची सोडून गेली होती. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक

शाळा शिडवणे नं.१



Sunday, August 20, 2023

🛑 भाईमामा : द ग्रेट मामा

🛑 भाईमामा : द ग्रेट मामा

          प्रत्येकाला मामा असणे खूप गरजेचं असतं. आईचा भाऊ म्हणून आपल्या भाचरांची काळजी घेणारा मामा सर्वांनाच नेहमीच हवाहवासा वाटत असतो. ज्यांना एकही मामा नसेल त्यांना मामा नसल्याचं दुःख सतत सतावत असणार.

         आम्ही भावंडे मात्र मामांच्या बाबतीत अतिश्रीमंत आहोत. आम्हाला सहा मामा. चार सावत्र आणि दोन सख्खे. आबामामा , नानामामा , अण्णामामा आणि भाऊमामा हे चार सावत्र मामा. भाईमामा आणि बालामामा हे माझ्या आईचे सख्खे भाऊ. 

          आज यापैकी पाच मामा हयात नाहीत. बालामामा हे माझ्यासाठी नेहमीच आयडॉल ठरले आहेत. रत्नागिरीत असताना त्यांनी मला दिलेली शाबासकीची थाप अजूनही पाठीवर तशीच आहे.

          मोठ्या सर्व सावत्र मामांचे अनेक उत्तम संस्कार मनावर कोरले गेले आहेत. ते सुसंस्कार होते म्हणून मी आज असा आहे. 

          मला आज माझ्या भाईमामांबद्दल सांगायचे आहे. ते जाऊन आज आठ वर्षे होत आहेत. त्यांच्या आठवणी अजुनही ताज्याच आहेत. मी त्यांना कधीही विसरु शकणार नाही.

          भाईमामा म्हणजे एक शांत संयत व्यक्तिमत्त्व. एक हाडाचे प्राथमिक शिक्षक. घरात मवाळ , पण शाळेत जहाल. जहाल म्हणजे कडक शिस्तीचे. त्यांचं हसू ओठातल्या ओठातच. त्यांचं प्रेम पोटातल्या पोटात. प्रेम आहे पण ते सहसा कळू द्यायचे नाही असा त्यांचा स्वभाव. 

          मी मोठा होत असताना भाईमामांना अगदी जवळून बघत आलोय. दर शनिवारी ते आमच्या दुकानात येत. सहजच. फक्त आम्हाला भेटायचे निमित्त असे. ते एखाद्या शनिवारी आले नसले तर आम्हाला त्यांची आठवण येत राही. अजूनही येते. 

          ते आले की एक चैतन्य दुकानात शिरत असे. मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असू. येताना त्यांनी चहा आणि शेवचिवडा यांची ऑर्डर हमखास दिलेली असे. बोलता बोलता टकल्यांच्या हॉटेलमधील आम्हांला सगळ्यांना आवडणारा शेवचिवडा समोर येत असे. आम्ही सर्व मिळून चिवडा फस्त करण्याची आठवण अजूनही जात नाही. हे अप्रतिम क्षण पुन्हा कधीही येणार नाहीत. 

          भाईमामांनी आम्हांला अनेकदा आर्थिक आधार दिला आहे. मानसिक आधार तर ते नेहमीच देत असत. त्यांना पान खाणे आवडायचे. पान तयार करण्याची त्यांची पद्धत आगळी होती. एखादे सुंदर पान निवडून त्याच्या सर्व शिरा काढून नंतर चुना लावत असताना तंबाखुची निवडक पाने त्यात टाकली जात. मग त्याला एक विशिष्ट घडी घालून पानाची तोंडात उडी पडे. हे करत असताना त्यांच्या गप्पा सुरुच असत. माझे मात्र त्यांच्या या हालचालींकडे अधिक लक्ष असे. 

          मी शिक्षक झाल्यानंतर लवकर नोकरीला लागण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझ्यासोबत आले. आदल्या दिवशी रात्री त्यांनी मला केलेले मार्गदर्शन मी कदापि विसरणार नाही. ते म्हणाले , " हे बघ भाच्या , तू मागे मागे राहू नकोस. मी मागे राहिलो. मी कधी चारचौघात बोललो नाही. पण तू मात्र तसे करु नकोस. प्रत्येक वेळी संधी तुझ्याकडे चालून येईल , त्या सर्व संधींचे सोने करणे फक्त तुझ्या हातात आहे. " 

          त्यांचे हे मार्गदर्शन मला नेहमीच पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आज मामा नाहीत , पण त्यांचे ते अनमोल शब्द सदैव माझ्यासोबत असतात. 

          सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक दोन महिन्यांतच ते आजारी पडले. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने डोंगराएवढे प्रयत्न केले. लाखो खर्च केले. परंतु आठ वर्षांपूर्वी ते आम्हाला कायमचे सोडून निघून गेले. एका मार्गदर्शक तत्त्वाचा अंत झाल्याची भीती माझ्या मनात वाटून गेली. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मी माझ्या आठवणींच्या कुपीत अगदी जपून ठेवली आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Tuesday, August 8, 2023

🛑 ' कारटो ' ची कल्पना

 🛑 ' कारटो ' ची कल्पना

          कल्पना धाकू मलये नावाची माझी डीएडची मैत्रीण. तिने ' कारटो ' नावाची एक बालकादंबरी लिहिली आहे. ती खूप छान लेखन करते. तिने केलेलं लेखन वाचकाला भावणारं आहे. लहानपणी घडणाऱ्या कित्येक गोष्टी कल्पनाने लक्षात ठेवल्या आहेत. गोष्टी नुसत्या लक्षात ठेवून चालत नसतात , त्या काळजीपूर्वक आणि क्रमबद्ध मांडाव्या लागतात. कल्पनाने अगदी तसंच केलंय. 

          बालमनाला दांडगा अभ्यास असणारी व्यक्तीच असं करु शकते. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा बारकाईने विचार केल्याने कादंबरी वाचनीय झाली आहे. कादंबरीच्या नावामुळे तर ती हातात घेऊन बघण्याचा आणि वाचण्याचा मोह व्हावा. कल्पना चांगलं लिहिते एवढं मला माहिती होतं. पण ती अतिशय कसदार आणि दर्जेदार लिहू शकते हे ' कारटो ' वाचल्यानंतर कोणीही सांगू शकेल. लेखिका म्हणून कल्पना जिंकली आहे. तिने कारटो मध्ये अनेकानेक परखड मतं व्यक्त केली आहेत. एक महिला असं लिहिते आहे म्हणून आणखी अभिमानास्पद आहे.

          मालवणी बोलणारी अनेक प्रसिद्ध माणसे मी बघितली आहेत. नटवर्य कै. मच्छिंद्र कांबळी यांना मी लहानपणापासून ऐकत आलोय. मी ज्याठिकाणी राहायला होतो , तिथे शेजारी गॅरेज होते. त्या गॅरेजमध्ये ते एकदा आले होते. मी धावत जाऊन त्यांची सही घेतल्याचे मला चांगलेच आठवते आहे. त्यावेळीसुद्धा ते माझ्याशी शुद्ध मालवणीत बोलले होते. त्यांची बरीच नाटके प्रत्यक्ष पाहिली , तेव्हा त्यांचं मालवणी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येतं. कल्पनाची मालवणी भाषेवरील तशीच पकड असल्याचे दिसून येते. शक्यतो तिची मालवणी भाषा शुद्ध आणि जिव्हाळ्याची वाटते. मालवणी शब्दांना तिने लहानपणापासून अधिक आपलेसे केले असावे. आम्हां लोकांना प्रमाणभाषेचं कोडकौतुक वाटत असतं. ती बोलताना आम्ही मालवणी भाषेचं टोनिंग वापरताना अनेकदा चुकत असतो. हे चुकलेलं पुण्यातील लोकांना लगेच समजतं. कारण आमची प्रिय मालवणी भाषा हेल काढणारी आहे. ती हेल वगैरे काढणारी असली तरी ती आम्हाला प्रिय आहे. 

          कल्पना मलये हिने लहान असतानाच्या तिला शंका वाटणाऱ्या गोष्टी जशास तशा मालवणीत शब्दबद्ध केल्या आहेत. तिची मराठी भाषाही स्वच्छ आणि शुद्ध असते. तिला दोन्ही भाषेतून बोलताना आणि तिने दोन्ही भाषेतून लिहिलेले वाचताना तिची साहित्यविषयक उंची लक्षात येते. मीसुद्धा थोडेफार लेखन करतो. तरीही तिची उंची गाठू शकण्यासाठी मला भरपूर अभ्यास करावा लागेल. 

          तिच्या पुस्तकाला वाचल्याशिवाय बोलणे हे कधीही मूर्खपणाचे ठरेल. तिच्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघू शकतात म्हणजे तिचे पुस्तक वाचायलाच पाहिजे असा अर्थ होतो. कोणत्याही लेखकाचे किंवा लेखिकेचे पुस्तक न वाचता आपल्याला कोणतेही भाष्य करता येणार नाही. ते पुस्तक वाचल्याशिवाय त्यात काय वेगळं आहे ते समजणारही नाही. त्यासाठी ते स्वतः विकत घेऊन वाचले पाहिजे. विकत घेऊन पुस्तक वाचण्यात नक्कीच मजा असते. पुस्तक संग्रही राहतं हा आणखी एक फायदा. 

          पुस्तकाचं शीर्षक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ' कारटो ' हे नाव म्हणजे एका आपल्यासारख्याच प्रश्न विचारणाऱ्या मुलाच्या नावाचं संक्षिप्त रुप आहे. हा मुलगा चोखंदळ आहे , विज्ञानावर प्रेम करणारा आहे. शंकांची उत्तरं शोधून काढणारा आहे. म्हणून हा कल्पना मलये यांचा ' कारटो ' सर्वांनाच सतत भुरळ घालत राहणार आहे. यांवर आधारित एखादा चित्रपट किंवा बालनाट्य बनायला हरकत नाही. कल्पनाने केलेल्या कल्पना जर समजून घ्यायच्या असतील तर प्रत्येकाने हे पुस्तक नक्की घ्या आणि नुसतं घेऊन उपयोग नाही , ते शेवटपर्यंत वाचून काढा. मग समजेल ' कारटो ' म्हणजे काय रसायन आहे ते !!!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )